राकेश जोशी, नाशिकस्मृतिभंशामुळे सुमारे तीन महिन्यांपासून अंथरूणावर खिळलेली आई... वडील नसल्याने आईचाच काय तो एकमेव आधार... अशातही आई ओळखत नसल्याची आॅलिम्पिकपटू मुलाला असलेली खंत... अन् चमत्कार घडावा त्याप्रमाणे आईने आॅलिम्पिक स्पर्धेतून पदक पटकाविण्यासाठी भरभरून दिलेला आशिर्वाद असा दुर्मीळ अन् तितकाच हृदयद्रावक प्रसंग शुक्रवारी घडला. ही कहाणी आहे, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील रोर्इंग अर्थात नौकानयन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोहीचा जवान दत्तू भोकनळ आणि त्याच्या आईची.
त्याचे झाले असे, साधारण तीन महिन्यांपूर्वी दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला. त्यावेळी त्याची आई आशाबाई ऊर्फ अक्का या घरात पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्या. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी त्यात त्यांना मेंदूला मार लागल्याने त्यांचा स्मृतिभंश झाला. त्या परिचितांना ओळखूही शकत नव्हत्या, अशी त्यांची स्थिती झाली होती. त्यांना तातडीने लष्कराच्या पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हासुद्धा दुर्दैव आड आले. दत्तूला आईने ओळखलेच नाही. दरम्यानच्या काळात उपचार सुरूच होते. काही काळानंतर आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवानादेखील झाला. अमेरिकेत सराव करताना दु:ख उराशी बाळगत आंतरराष्ट्रीय रोर्इंग (नौकानयन) स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. या काळात त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आईशी संपर्क साधला असला तरी दैव त्याला साथ देत नव्हते.
अखेर तो सुदिन उजाडला. शुक्रवारी दत्तूने नेहमीप्रमाणे आईशी फोनवरून संवाद साधला असता रूग्णालयातील उपचार आणि दैव बलवत्तर म्हणा आईने हळूहळू का होईना पण आपल्या दत्तूला ओळखले. आई ‘अक्का’ यांनी या संवादात दत्तूला आॅलिम्पिक स्पर्धेसाठी नुसत्याच शुभेच्छा दिल्या असे नाही तर ‘बेटा, देशासाठी पदक पटकावून आणच...’ असा भरभरून आशीर्वाददेखील दिल्याचे दत्तूचे मामा रवींद्र वाकचौरे यांनी सांगितले. त्यावेळी दत्तूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई पूर्वपदावर येत असल्याचा दत्तूचा आनंद काही औरच होता.