मविआने आज पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. यात वादग्रस्त राहिलेली सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आली आहे. दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनही सतेज पाटील आणि विशाल पाटील यांना अपयश आले आहे. या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झाले असून उद्या महत्वाची बैठक होणार आहे. यानंतर दोन दिवसांत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
सांगलीतीलकाँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट असून विशाल पाटील यांच्या शेजारीच असलेल्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमू लागले आहेत. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आमचे काय चुकले असा सवाल करत विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उद्या काँग्रेस भवनामध्ये बैठक बोलविण्यात आल्याचे म्हटले आहे. तर विक्रम सावंत यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सांगलीची जागा मेरिटप्रमाणे मागत होतो. उद्या बैठक आहे. तालुकावार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार आहोत. विशाल पाटील अपक्ष उभे राहणार का, यावर दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार. विश्वजित कदमांसोबत अद्याप बोलणे झालेले नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विशाल पाटील अपक्ष लढणार का, या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला आहे.