कारवाईचे प्रमाण वाढतेय : ११ महिन्यात ६०६ सट्टेबाज गजाआडनागपूर : ११ महिन्यात चक्क ६०६ सट्टेबाज गजाआड! हा आकडा एखाद्या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहराचा नसून राज्याची उपराजधानी व देशाचे केंद्रस्थान असलेल्या नागपूरचा आहे. विकासाच्या प्रगतिपथावर असलेल्या नागपूरची हळूहळू ‘बेटिंग सेंटर’ म्हणून ओळख निर्माण होत असल्याचे दुर्दैवी वास्तव आहे. परंतु वाढत्या सट्टेबाजीसोबतच पोलिसांकडून कारवाईचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. माहितीच्या अधिकारातून सट्टेबाजांच्या अटकेचा हा आकडा समोर आला आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील सट्टेबाजांविरोधात झालेल्या कारवाईबाबत पोलीस विभागाच्या गुन्हेशाखेला विचारणा केली होती. यावर मिळालेल्या माहितीनुसार २०१४ सालात नोव्हेंबर महिन्यापर्यंत शहरात ६०६ सट्टेबाजांना अटक करण्यात आली.क्रिकेट असो, निवडणूका असो किंवा अगदी पावसाचा अंदाज. गेल्या काही वर्षांपासून सट्टेबाजीचे प्रमाण वाढीस लागले आहे. नागपुरातील अनेक भागात तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार चालतो. विशेषत: क्रिकेट सामन्यांदरम्यान हे प्रमाण वाढीस लागते असे चित्र आहे. गुन्हेशाखेकडून कारवाईचे प्रमाण वाढले असले तरी तंत्रज्ञानाचा उपयोग यात वाढीस लागला आहे. यावर नियंत्रण आणणे हे नक्कीच पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.(प्रतिनिधी)४७ टक्क्यांनी वाढले अटकेचे प्रमाणगुन्हेशाखेकडून सट्टेबाजांवर कारवाई करण्याचे प्रमाण गेल्या ३ वर्षांपासून वाढीस लागले आहे. २०११ साली ४१० सट्टेबाजांना अटक करण्यात आली होती. २०१२ साली हाच आकडा ३८७ होता तर २०१३ साली हे प्रमाण ५४२ वर पोहोचले. २०११ च्या तुलनेत २०१४ वर्षाच्या ११ महिन्यांत अटकेचे प्रमाण ४७ टक्क्यांनी वाढीस लागले आहे. गिट्टीखदान, पाचपावली आघाडीवरशहरातील काही भागांमध्ये सट्टेबाजीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. आकडेवारीनुसार सर्वाधिक ८९ सट्टेबाजांना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली तर पाचपावली येथून ५६ जणांना ताब्यात घेण्यात आले.
उपराजधानी बनतेय ‘बेटिंग सेंटर’
By admin | Published: January 05, 2015 12:55 AM