मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने आता एक महिन्याचा कार्यकाळा पूर्ण केला आहे. तसेच या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही सोमवारी पार पडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला असून, भाजपापासून सावध राहा, असा सल्ला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. ''खूप मोठया संघर्षानंतर हे सरकार बनले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवा. भाजपाने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. ते तुमची आणि या सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे खूप काम करा. भाजपाच्या कारवायांमुळे स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नका.'' असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवनिर्वाचित मंत्र्यांना मार्गदर्शन केले आहे. भाजपाचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांसारखे वागा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
भाजपापासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित मंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 1:56 PM