यशवंत गव्हाणे - कोल्हापूर --‘हॅलो, हॅलो... प्रधानमंत्री जनधन योजना कार्यालय, दिल्ली से बात कर रहा हूँ. जनधन योजनाके अंतर्गत आपका मोबाईल नंबर सिलेक्ट किया गया है. इसके माध्यमसे आप को हर महिने कमसे कम २०,००० रुपये कमाने का मौका मिलेगा. आपको खाली रोज बीस से चालीस एसएमएस करना है. और लोगोंको प्रधानमंत्री जनधन योजनाकी जानकारी देना है’, अशा प्रकारची गळ घालणारे फोन करून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची हजारो रुपयांची फसवणूक केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री जनधन विमा योजना राबविली आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक यामुळे अल्प बचतीमध्ये विमा उतरू शकले. याच योजनांचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना गंडविण्याचा धंदा मांडला जात आहे. त्याला सर्वसामान्य नागरिक बळी पडतात. फोन केल्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेचे नाव घेतल्याने नागरिकांना शासकीय विमा योजनेबद्दल चौकशी करत असल्याचा गैरसमज होतो. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवतो. मग त्यांना योजनेची माहिती पुरविण्यासाठी तुमची निवड झाल्याचे सांगितले जाते. यासाठी तुम्हाला लॅपटॉप, स्मार्टफोन, सीमकार्ड खरेदी घेण्यासाठी एक लाख रुपयांचा चेक पाठविला जाणार आहे, तसेच सोबत जनधन योजनेच्या माहिती पुस्तिकाचे व्ही. पी. पार्सल पाठविले जाते. यासाठी संपूर्ण पत्ता विचारला जातो. जोपर्यंत पार्सल मिळत नाही, तोपर्यंत फोन केला जातो. जेव्हा तुम्ही ते व्ही. पी. पार्सल घेता, तेव्हा तुम्हाला २,६२५ रुपये भरावे लागतात. आणि पार्सल उघडल्यावर मात्र त्यात काहीच नसते. अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची सरळ सरळ फसवणूक केली जाते. महिन्यात येतात पाच-सहा फसवी पार्सल अशाच प्रकारचे एक पार्सल कोल्हापुरातील फुलेवाडी पोस्ट आॅफिसमध्ये आले होते. तिथे चौकशी केली असता समजले की, अशाप्रकारची पार्सल महिन्यात सात-आठ तरी येतात. आम्ही नागरिकांना याबाबत नेहमी जागृत करतो. तरीपण काहीजण अशी व्ही.पी. पार्सल स्वीकारतात. जेव्हा पार्सल उघडले जाते, तेव्हा त्यात कधी खोटी साखळी, अंगठी किंवा देवाचा लहान फोटो असतो. तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध जर खटला दाखल करायचा असेल, तर तेथील न्यायालयात दाखल करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते परवडणारे नसते व परराज्यात जाण्या-येण्याचा खर्च आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे अशी फसवणूक करणारे मोकाटच राहतात. फोन नंबर नॉट रिचेबलज्या नंबरवरून असे फोन येतात, ते नंबर फसवणूक झाल्यानंतर मात्र नॉट रिचेबल लागतात. फुलेवाडीत एका नागरिकाने असे पार्सल स्वीकारले नाही व ज्या नंबरवरून त्यांना फोन येत होता, त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी प्रथम रिसीव्ह केला. मात्र, त्यांना याचा जाब विचारता त्यांनी फोन बंद केला. तो आजपर्यंत नॉट रिचेबल लागतो.
फसव्या कॉलपासून सावधान!
By admin | Published: June 10, 2015 10:51 PM