मुंबई : मंगळवारी अंधेरी ते विलेपार्ले या स्थानकांदरम्यान जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्यामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची सेवा बुधवारीही पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती. ही सेवा रुळावर आणण्यासाठी २२ तास लागले आणि बुधवारी १00 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना लेटमार्क लागला. ट्रॅकवरील डबे हटविण्याचे काम बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी सकाळचे साडेआठ वाजले आणि त्यानंतर अर्ध्या तासाने लोकल सेवा पूर्ववत झाली. लोकल सुमारे अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत होते. लोकल उशिरा असल्याची माहिती सकाळपासूनच प्रसारमाध्यमांर्फत मिळाल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा पर्याय अवलंबला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर उतरल्याने वाहतूक कोंडीचा सामनाही मुंबईकरांना करावा लागला. मंगळवारच्या घटनेत सिग्नल यंत्रणेलाही धक्का बसल्याने जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणा प्रभावित राहिली आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचा फटका घरी परतणाऱ्या मुंबईकरांना बसत होता. सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने मध्य रेल्वे विस्कळीतअंबरनाथ : पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वेनंतर बुधवारी मध्य रेल्वेही अंबरनाथदरम्यान विस्कळीत झाली. दुपारी २ वाजता कर्जतकडे जाणारी लोकल बी केबिनजवळ आली असता तिच्या मोटरमनला सिग्नल न मिळाल्याने त्याने गाडी थांबवून जवळील अंबरनाथ स्थानकाला माहिती दिली. यामध्ये सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरची वाहतूक २५ ते ३० मिनिटे ठप्प झाली होती. हा बिघाड दुरु स्त होईपर्यंत अनेक गाड्या एकामागोमाग खोळंबल्या होत्या. यात हैदराबाद एक्स्प्रेससारख्या लांब पल्ल्याच्या गाड्याही उभ्या होत्या. अखेर, सिग्नल दुरु स्त केल्यानंतर लोकल सुरू झाल्या. या घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी दिवसभर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. अपघात लोकलचे चाक तुटल्याने ?हा अपघात लोकलच्या एका डब्याचे एक चाक निखळल्याने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा डबा रेल्वे कामगार उचलत असतानाच त्याचे चाक तुटून निखळल्याचे निदर्शनास आले. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी सांगितले की, चाक निखळल्याची बाब खरी आहे. मात्र अपघाताच्या दणक्याने लोकलचे चाक निखळले की अन्य काही कारणांमुळे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मेल-एक्सप्रेस रेल्वेवर परिणाम मुंबईत येणाऱ्या व मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला. ट्रेन नंबर १२९३२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर ट्रेनचा बोरीवली स्थानकात शेवट करण्यात आला. ट्रेन नंबर १२९३१ मुंबई सेन्ट्रल-अहमदाबाद डबल डेकर दुपारी तीन वाजता बोरीवली स्थानकातून सोडण्यात आली. तर कर्णावती एक्सप्रेसह अन्य काही एक्सप्रेसचा बोरिवलीत शेवट करण्यात आला. बोरीवलीहून लोकल रिटर्न। सकाळी ६ वाजता पूर्ण होणारे काम हे साडे आठ वाजता पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यापूर्वी धीम्या लोकल गाड्या खूपच उशिराने धावत होत्या. तर काही गाड्यांना अंधेरी तसेच बोरीवली स्थानकातून पुन्हा विरारकडे पाठवण्यात येत होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. १८ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीला सुरुवात । योची रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे. १८ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीला सुरुवात होईल, अशी माहिती परेने दिली. घटनेबाबत काही माहिती असल्यास प्रवासी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांनी चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयातील सुरक्षा आयुक्तालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
‘परे’ २२ तासांनंतर रुळावर
By admin | Published: September 17, 2015 2:07 AM