Bhagat Singh Koshyari CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांच्या राज्यपालपदी असतानाच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोश्यारी हे अचानक मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला का गेले? त्यांच्या भेटीचे नेमके कारण काय, अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर आलेल्या निकालात माजी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर नियमबाह्य कार्यवाही केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती असं म्हटलं होतं. भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगलेच चर्चेत होते. त्यांचे अनेक वेळा मविआ सरकारबरोबर खटके उडाले होते. तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुनही ते चर्चेत आले होते. आणि १२ आमदारांच्या नियुक्त्या न करण्याचं प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी वर्षा बंगल्यावर आल्याने आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.