मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती. मात्र, ही दगडफेक बसच्या बाजूने गेलेल्या भगवा झेंडेधारकांनी केली नसून, त्यांच्या बाजूने जाणाऱ्या बाइकस्वारांनी केल्याची माहिती महिला साक्षीदाराने आयोगाला दिली.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. माजी न्यायाधीश जे. एन. पटेल व माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांची आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणे येथे राहणाºया एका ग्राफिक डिझायनरने आयोगापुढे साक्ष नोंदविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी संघटनेच्या सभासद असलेल्या महिलेने, आपण कोरेगाव भीमा येथे का गेलो व तिथे काय पाहिले, याची माहिती न्यायालयाला दिली. ४४ वर्षांनंतर आपण पहिल्यांदाच मंडळामुळे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला सहकुटुंब गेलो होतो. मंडळाचे एकूण ४९ सदस्य आपल्याबरोबर होते. कोरेगाव भीमाला जाण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी खासगी बस केली होती. विजयस्तंभापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरबस थांबविली. विजयस्तंभाकडे जाताना मोठा जमाव धावतपळत मागे फिरला. विजयस्तंभाजवळ दगडफेक होत आहे, तिथे जाऊ नका, अशी सूचना जमावातील काही लोकांनी दिली. त्यामुळे परत फिरलो. मात्र, त्या वेळी आमच्यावरही दगडफेक करण्यात आली. आमच्यातील काही जखमी झाले. आम्ही कसेबसे बसमध्ये गेलो. पुढे गेल्यावर एक जमाव आमच्यासमोर आला. त्यांनी आम्हाला आमच्या बसवरील निळे झेंडे आणि बॅनर्स काढण्याची सूचना केली. ते न उतरविल्यास पाठीमागून येणारा जमाव हल्ला करेल, असा सावधानतेचा इशारा दिला. त्यामुळे आम्ही घाबरून बसवरील झेंडे काढू लागलो, परंतु त्या आधीच एक जमाव आला आणि त्यांनी आमच्या बसवर दगडफेक केली, अशी माहिती साक्षीदाराने उलटतपासणी दरम्यान न्यायालयाला दिली.आज उलटतपासणीकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. प्रधान यांनी हातात भगवे झेंडे घेतलेल्या जमावाने तुमच्या बसवर दगडफेक केली का, असा सवाल साक्षीदाराला केला. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तसेच दगडफेक करणाºया जमावाच्या म्होरक्याला आपण ओळखू शकतो, असेही आयोगाला त्यांनी सांगितले. सरकारकडून साक्षीदाराची उलटतपासणी गुरुवारी घेण्यात येणार आहे.
भगव्या झेंडेधारकांनी दगडफेक केली नाही; साक्षीदाराची आयोगाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:26 AM