पुणे - कोल्हापूरातील कागल येथे भाजपा नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपाची साथ सोडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता पंढरपूरातील एक मोठा नेता शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पंढरपूरातील आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत पंढरपूर मतदारसंघाबाबत चर्चा झाली. भगीरथ भालके हे पंढरपूरची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भगीरथ भालके म्हणाले की, मी आगमी विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे. लवकरच येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे. त्यावर साहेबांशी बोलणं झालं अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केले आहे. आमच्या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पडली. त्यामुळे विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे. शरद पवार माझा नक्कीच विचार करतील. मी येणारी निवडणूक लढवणार आहे. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन शरद पवारांनी दिल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितले.
पंढरपूरातील पोटनिवडणुकीत पराभव
२०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणारे भगीरथ भालके यांना भाजपाच्या समाधान आवताडे यांनी हरवलं होते. भगीरथ भालके हे भारत भालके यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होती. दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. २०१९ मध्ये भालकेंनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता. भगीरथ भालके यांनी मध्यंतरी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.