Dhananjay Munde Namdev Shastri: मागील दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे राजकीय आरोपांच्या तोफेच्या तोंडी सापडल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात आरोप होत असून, मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (३० जानेवारी) भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे, अशी चर्चा आहे; असा प्रश्न भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले, "भक्कमपणे पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावं वाटतं की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवलं नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते."
"धनंजय मुंडे खंडणी घेणारा माणूस नाहीये"
"त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेताहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाहीये. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाहीये ना", असे महंत नामदेव शास्त्री म्हणाले.
"वारकरी संप्रदायावरही परिणाम झालाय"
"याचा भयानक परिणाम झाला आहे. वारकरी संप्रदायावरही झाला आहे. जातीयवाद ज्या लोकांना माहिती नाही, त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीयवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात, त्यांच्यामध्येही तेढ निर्माण होत आहे. राजकीय फायदा क्षणित असतो, पण सामाजिक सलोखा बिघडवणे कायमस्वरुपी असते", अशी भूमिका नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल मांडली.