अहिल्यानगर/बीड/मुंबई : धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. धनंजय गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो. भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी मुंडेंची पाठराखण केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. महंतांकडे जाऊन पाप लपत नाही, असा टोला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशीरा भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी प्रसिद्धिमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निघृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? हे माध्यमांनी का दाखवले नाही? कारण अगोदर त्यांना झालेली मारहाणही दखल घेण्यासारखी आहे. संतोष देशमुख यांनी आरोपींना आधी चापट मारली होती, त्यानंतर हे सगळे घडले, असेही नामदेव शास्त्री म्हणाले. त्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला असून नामदेव शास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.महंतांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे, परंतु धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा आधार का घ्यावा लागतोय, पक्ष, त्यांचे नेते हे बाजूला जात आहेत का? असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.
आमची मानसिकता काय झाली असेलधनंजय देशमुख म्हणाले, एक चापट मारल्याच्या बदल्यात आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून केला. एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल असे तुम्ही म्हणता, मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज बघतोय, सगळे लोक बघतायत, त्याचेही उत्तर दिले पाहिजे.
'गादीने सुडाविरोधात बोलावे'मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेण्याऐवजी नामदेव शास्त्री यांनी किंवा एखाद्या गादीने द्वेष व सुडाच्या विरोधात बोलावे, असे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. ते म्हणाले, नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख यांच्याबद्दल केलेले वक्तव्य योग्य नाही. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गँगला पोसण्याचे काम मुंडे यांनी केले.
'गड कोणाला पाठीशी घालू शकत नाही...'नामदेव शास्त्री हे मोठे महंत आहेत. ते बोलले असतील असे वाटत नाही. पण ते जर असे बोलले असतील तर दुर्दैव आहे. याला गुंडगिरीला प्रोत्साहन देणे म्हणतात, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी महंत शास्त्रींवर टीका केली. महंतांजवळ जाऊन पाप लपणार नाही, 'गड' कोणालाही पाठीशी घालू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले.
नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा द्यावाजळगाव : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही वर्चस्वातून झालेली आहे. यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांचे मित्र वाल्मीक कराड यांना वाचविण्याचा प्रयत्न मुंडे यांच्याकडून होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत नैतिकतेच्या आधारावर मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जळगाव येथे केली.
ते म्हणाले की, या प्रकरणात मराठा व वंजारी समाज असा संघर्ष नाही. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपात तथ्य दिसून येत आहे. याबाबत दमानिया यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा. सध्या शपथविधीचा काही टायमिंग राहिलेला नाही. त्यामुळे आरोपातून ते निर्दोष झाल्यास पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.