- दीपक होमकर, पंढरपूरखैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड ओळखून नामदेवांनी तेथे भागवत धर्माचा प्रचार केला. उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्म व संस्कृती टिकली, असे प्रतिपादन संत नामदेव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कामत यांनी केले़पंढरपुरात शनिवारी पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले़ अध्यक्षीय भाषणात कामत म्हणाले की, ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चीरे.. संत पाय हिरे वरी देती’ हाच नामदेवांचा सिद्धांत आहे. ते ज्ञानेदवांचे चरित्र लिहिणारे मराठीतील आद्य चरित्रकार, आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार होते,तसेच त्यांनी त्या काळात जनाबार्इंच्या गळ्यात वीणा देऊन स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. नामदेवांनी ज्ञानेश्वरांसोबत जेव्हा उत्तर भारत तीर्थयात्रा केली, त्याचवेळी तेथील पारतंत्र्याची, धार्मिक गळचेपीची आणि सामाजिक दुर्बलतेची स्थिती जवळून अनुभवली. मंगळवेढ्याचे संत चोखामेळा यांच्या अस्थी आणून उपेक्षितांचा खऱ्या अर्थाने गौरव केला. पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी भागवत धर्माचा, आपल्या संस्कृतीचा वारसा टिकविण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर नानकदेव यांनी त्यांच्यासह या कार्यास प्रारंभ केला. त्यामुळे संत नामदेव हे ज्याप्रमाणे वाङ्मयाचे आद्यपुरुष आहेत, तसेच ते वैष्णवांचे आणि शैवांचेही कुळपुरुष असल्याचे गौरवोद्गार डॉ़ कामत यांनी काढले़. ‘८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे झाले. ते खऱ्या अर्थाने अखिल भारतीय संमेलन म्हटले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले़ आ. भारत भालके, माजी आ. सुधाकर परिचारक आदी प्रमुख पाहुणे होते. उद्घाटनाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. यु. म. पठाण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)
नामदेवांमुळेच उत्तरेत भागवत धर्माची पताका
By admin | Published: November 01, 2015 1:43 AM