‘भाईजान ने सबको काटा... चाची बचाव, चाची बचाव...’ अशी जिवाच्या आकांताने सुबिया पहाटे ३ वा.च्या सुमारास ओरडत होती. सुरुवातीला या ओरडण्याचे नेमके कारण काहीच समजले नाही, परंतु मुलगा अल्ताफला जागे केले. त्या वेळी सुबिया तिच्या घराच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत भेदरून ओरडत असल्याचे पाहिले... आणि आम्ही सर्वच तिच्या मदतीला धावलो... अशी माहिती हे हत्याकांड झालेल्या घराच्या शेजारील रहिवासी आणि तिचे नातेवाईक शाहीस्ता वरेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.जितेंद्र कालेकर ल्ल ठाणेसुबियाचा आवाज ऐकून आम्हाला सुरुवातीला घराच्या समोरची लहान मुले नेहमीप्रमाणे त्रास देत असतील, म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी हा असा काहीतरी आवाज दिला जात असेल, असे वाटले, परंतु जोरदार आवाज येत असल्याने, मुलगा अल्तमेश यालाही जागे केले. आम्ही बाहेर आलो, तेव्हा सुबिया घराच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये येऊन बसली होती. त्याच लोखंडी ग्रीलवर स्टीलचा ग्लास आदळून ती लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करीत होती. त्या वेळी ‘भाईजान ने सबको काटा... चाची बचाव, बचाव...’ ‘दरवाजा खोलो ना पहले...’ ‘तुम आगे मत आओ,’ असेही ती सुचवत होती. असा बचावासाठी ती धावा करीत असल्याने, काहीतरी भयंकर घडल्याचा अंदाज आला आणि काळजाचा ठोकाच चुकला.मारणारा इतके क्रूर कृत्य करतोय आणि तोही घरातलाच आहे, हे समजल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आम्ही बोलावले. तिचे मामा अयाज वरेकर, मुजीब वरेकर, चुलते जईद आणि जावेद शेख, इस्ताक कुरेशी आणि जाफर आदी नातेवाईकांनी पुढे येऊन, या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेले लोखंडी ग्रील तोडून काढले. त्यानंतर सुबियाला त्यांनी बाहेर काढले, तोपर्यंत हसनैननेही गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली होती.शनिवारीच भाईजानने सर्वांना दावतसाठी बोलवले होते. विशेष म्हणजे, तो तिन्ही बहिणींच्या घरी स्वत: गेला होता. ‘शनिवारी मी दावत देणार आहे. तुम्ही सर्वांनी यायलाच पाहिजे,’ असे तिघींना आणि त्यांच्या मुलांना त्याने आग्रहाखातर सांगितले. विशेष म्हणजे, या बहिणींच्या पतींना अर्थात, त्याच्या तिन्ही मेहुण्यांना रविवारी दावतसाठी त्याने बोलवले होते. त्यावरूनच, हे हत्याकांड घडविण्यासाठी पुरुष मंडळींचा कोणताही अडसर होऊ नये, म्हणून किंवा आधी घरातल्यांना संपवून मग त्यांनाही वेगळी ‘दावत’ द्यायची, अशी त्याची योजना असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.> सुबियाला जाग आली आणि...साधारण रात्री ११ ते १२.३० वा.पर्यंत ही दावत सुरू होती. सर्वच आपल्या लाडक्या भाईजानच्या या दावतवर खूश होते. पहाटे १.३० नंतर प्रत्येक जण झोपी गेला. साधारण २ ते ३ या एक तासाच्या दरम्यान हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे. बरोबर ३ वा.च्या सुमारास सुबियाला काहीतरी आवाजाने जाग आली. ती उठली, तेव्हा समोर साक्षात तिचा सख्खा भाऊ हा यमदूत बनून समोर उभा होता. त्या वेळी त्याने त्याची मोठी बहीण शबिनावर चॉपरने वार केल्याचे तिने पाहिले. या हल्ल्यात शबिना जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली, पण इकडे सुबिया जागी झाल्याचे त्याने पाहिल्यामुळे तो तिच्याकडे धावला. त्याने तिच्यावरही चॉपरचा वार केला. तिने तो कसाबसा चुकवला, पण तरीही त्यात तिच्या मानेला गंभीर जखम झाली आणि तिने त्याला जोरदार धक्का देऊन हॉलमधून बेडरूमकडे पळ काढला. बेडरूमला तिने लागलीच कडी लावली आणि खिडकीच्या ग्रीलवर बसून बचावासाठी धावा करू लागल्याने, ती यातून सुदैवाने बचावल्याची माहिती पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे यांनी दिली.> काय होता ‘दावत’चा मेनूशनिवारच्या २७ फेब्रुवारी रोजी ‘दावत’मध्ये त्याने चिकन कबाब, तंदुरी, पापलेट फ्राय, कोळंबी, राइस आणि सरबत हा मेनू ठेवला होता. ही दावत अर्थातच, आई, वडील, अविवाहित बहीण आणि पत्नीलाही देण्यात येणार होती. या अन्नातून बेशुद्ध पडण्याचे औषधही मिसळल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यातच सर्व कुटुंबीयांची शुद्ध हरपल्यानंतर त्याने एकामागून एकाचा खून केला. > श्वासनलिका कट न झाल्याने सुबिया बचावली. हल्ल्यात ती गंभीररीत्या जखमी झाली असून, तिचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये तिने भावाने मारल्याचे सांगितले. तिची प्रकृती स्थिर झाल्यावर लवकरच पुढील जबानी नोंदविण्यात येणार आहे. - आशुतोष डुंबरे, सह-पोलीस आयुक्त, ठाणे शहर> नमाजप्रिय आणि कुटुंबवत्सल ते क्रूरकर्मा हसनैनठाणे : शाळेत पहिला क्रमांक, वर्तणूकही चांगली, नमाजप्रिय आणि कुटुंबवत्सल, तसेच कोणाला कधी चापटही न मारणारा... अशी एक चांगली प्रतिमा असलेला हसनैन वरेकर असे काही करेल, यावर त्याच्या नातेवाईकांचाही विश्वास बसत नाहीय. मग असे कसे घडले, असा सवाल वडवली गावात प्रत्येकाकडून उपस्थित केला जात होता.काळजाचा थरकाप उडवणारे १४ जणांचे हत्याकांड करणारा हसनैन असल्याचे नाव संपूर्ण गावात आणि नातेवाईकांमध्ये पसरल्यानंतर कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. दिवसभरात पाच वेळा नियमित नमाज पढत होता. घरात चांगल्या संस्कारांत वाढलेला असल्यामुळे त्याला कोणते व्यसनही नव्हते. अगदी खेळीमेळीत आणि हसतमुख असाच त्याचा स्वभाव होता, अशी माहिती त्याचे शेजारी अयुब शेख यांनी दिली. येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, ‘त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे घरात पतिपत्नीमध्येही वाद नव्हता. हे संपूर्ण कुटुंबच गावासाठी आदर्श होते. कारण त्याचे वडील अन्वर हेही समाजकार्यात अग्रेसर होते.’दहावीला तो शाळेत पहिला आला होता, तर एनकेटी महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले होते. पुढे तो सीएचे शिक्षण घेत होता. नवी मुंबईतील खासगी कंपनीत ५० हजारांच्या नोकरीवर काम करीत होता. त्यामुळे शैक्षणिक, आर्थिक आणि बौद्धिक, तसेच संस्कारक्षम असल्यामुळे हसनैनसारखे शिका, पुढे जा, असे उदाहरण मुलांना द्यायचा,’ अशी माहिती त्याचे शेजारी लईक पठाण यांनी दिली. (प्रतिनिधी)> या घटनेतील सर्व मुले, महिलांसह प्रत्येकाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर स्वत: हुसनैननेही गळफास घेतल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट होत आहे. त्याने प्रत्येकाचा गळ्यावर जोरदार वार केल्यामुळे, रक्तवाहिन्या आणि श्वसनवाहिन्या तुटल्या गेल्या आहेत. त्यातच या सर्वांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. अन्नातून काही विषप्रयोग केल्याचे आढळलेले नाही, परंतु पुढील तपासणीसाठी अन्नाचे कण मुंबईच्या कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.- डॉ. बी.सी. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे> माय बचावली पण तान्हुली गमावलीसुबिया भरमाल हिच्या ५ महिन्यांच्या अरसिया या तान्हुलीला मात्र आपले प्राण गमवावे लागले. अरसिया हिची आजी आजारी असल्याने तिचा मृतदेह शववाहिकेतून न घेऊन जाता तो कारमधून नेण्यात आला. वरेकर कुटुंबीयांतील सुबिया सर्वांत लहान मुलगी. तिचा दीड वर्षापूर्वी भिवंडी, गणेशपूर, म्हापोली येथील तरुणाशी निकाह झाला होता. तसेच तिला पाच महिन्यांची अरसिया नावाची तान्हुली होती. मारेकरी हसनैनने इतर दोन बहिणींसह सुबिया हिलाही मेजवानीसाठी शनिवारी घरी बोलावले. ती आपली तान्हुली अरसिया हिला घेऊन आली होती. मौजमजेत मेजवानी झाल्यावर ते सर्व कुटुंब झोपी गेल्यावर त्याने त्या १४ जणांच्या गळ्यावर सुरा फिरवला. याचदरम्यान, सुबिया हिच्याही मानेवर वार केला. तिने त्याच्याशी प्रतिकार केल्याने ती बचावली. दुसरीकडे तिच्या पाच महिन्यांच्या तान्हुलीला आपले प्राण गमवावे लागले. तिच्या मृत्यूबाबत सुबियाला अद्यापही माहिती दिलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.> राजकीय नेत्यांसह नातेवाईकांची रीघठाणे : मृतदेह ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यावर राजकीय नेते मंडळीसह वरेकर कुटुंबीयांच्या नातेवाईकांची तेथे रीघ लागली होती. सिव्हिल रुग्णालयात ८ तर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात ६ जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.खैरणे-बोनकोडेचे मूळ रहिवासी असलेले ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी कळवा रुग्णालयात धाव घेतली. दुपारी रुग्णालयात ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील हे शवागृहात शवविच्छेदन करीत होते. तर, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली.> वार्तांकन करताना कॅमेरामनचे निधन ठाणे : या हत्याकांडाचे वार्तांकन करताना ठाणे किसननगर-३ येथे राहणारा खासगी वृत्तवाहिनीचा कॅमेरामन रतन भौमिक याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी निधन झाले. त्याच्या पश्चात आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे.या हत्याकांडातील मृतदेह ठाणे सिव्हिल रुग्णालयात आणण्यात येणार असल्याने तो रुग्णालयात वार्तांकन करण्यासाठी गेला होता. याचदरम्यान, त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. सकाळी ८.३०च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. तो एका वृत्तवाहिनीसाठी ठाणे शहरात कॅमेरामन म्हणून काम करीत होता. त्याला यापूर्वीही हृदयविकाराचा एक झटका आला होता.>> खैरणेवर शोककळासूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबईया घटनेन खैरणेतील दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. ही दोन्ही कुटुंबे मयत हसनैन वरेकर याच्याच बहिणीची आहेत. खैरणे येथे राहणाऱ्या शबिना शौकत खान (३५) व मारिया अरफान फक्की (२८) या दोन्ही सख्ख्या बहिणी सख्खा भाऊ हसनैन वरेकर याच्याकडे दावतसाठी गेल्या होत्या. त्यानुसार शबिना व मारिया ह्या त्यांच्या मुलांना घेऊन हुसनैनच्या घरी गेल्या होत्या.सादिया खान (१६), अनस खान (१२), अलहीसन खान (६), उमेर फक्की (७) व युसूफ फक्की (४) अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. त्यांचे पती शौकत खान व अरफान फक्की हेदेखील दावतसाठी जाणार होते. परंतु काही कारणास्तव शनिवारऐवजी ते रविवारी कुटुंबाला परत आणण्याच्या निमित्ताने हुसनैनच्या दावतमध्ये सहभागी होणार होते. तत्पूर्वीच शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान हत्याकांडाची ही घटना घडली. दावत झाल्यानंतर हुसनैन याने चाकूने सर्वांचा गळा चिरून स्वत:ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.मयत शबिना व मारिया यांच्या कुटुंबीयांनी हसनैन याला आरोपी ठरवण्याला स्पष्ट नकार दिला आहे. तसेच पोलिसांनी संपूर्ण हत्याकांड प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. मयत हुसनैन हा कुटुंबातला सर्वांचा लाडका होता.यामुळे त्याच्याकडून बहिणींसह लहान भाच्यांची हत्या होणे शक्य नसल्याचा कुटुंबीयांचा ठाम दावा आहे; शिवाय घटनेच्या शेवटी हातात चाकू घेऊन गळफास लावून आत्महत्या केलेल्या स्थितीत हुसनैनचा मृतदेह आढळणे ही संशयाची बाब असल्याचे मत नातेवाईक सत्तार फक्की यांनी व्यक्त केले आहे.सादिया खान (१६) ही दहावीची विद्यार्थिनी असून, मंगळवारपासून तिची परीक्षा होती. शिक्षणात हुशार असलेल्या सादियाने दहावीच्या परीक्षेची चांगली तयारीदेखील सुरू केली होती. परंतु एका दिवसासाठी मामाकडे दावतसाठी ती आईसोबत गेली असता तिच्यावर काळप्रसंग ओढवला. > नैराश्येतूनच अशा विघातक गोष्टी घडतातएखाद्या व्यक्तीमध्ये नैराश्य आले की, ते हळूहळू विकसित होत जाते आणि मग ती व्यक्ती हेल्पलेस आणि होपलेस होते. माझा जगून काहीही फायदा नाही, मी जगत नाही, मेलेलेच बरे, अशी भावना निर्माण होते. मी मेलो तर माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांचे काय होणार, असा विचार करीत त्या कुटुंबातील सदस्यांचीदेखील हत्या करून ती व्यक्ती स्वत: आत्महत्या करते. मात्र, ही विचारधारा एका दिवसात तयार होत नाही. त्याला सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो. त्या व्यक्तीमध्ये उदासीनता आल्यावर ती कमी न झाल्यामुळे व त्या काळात तिला योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ती आजारात रूपांतरित होते. ती तशीच राहिली की, त्याचे धोकादायक स्टेजमध्ये रूपांतर होऊन आत्महत्या करण्यापूर्वी अनवधानाने त्या व्यक्तीकडून त्याच्या आसपासच्या लोकांना हिंट्स दिल्या जातात. ‘अरे मी नसलो तर काय होईल’, ‘मी तुला दिसलो नाही, तर...’ किंवा तो सर्वांना भेटून घेतो आणि ‘ही आता आपली शेवटची भेट’ असेही म्हणतो. किंवा ज्या नातेवाइकांना तो कधी भेटलेला नसतो, अशांना भेटतो. तो जेव्हा असे बोलत असतो, तेव्हा आपल्याला त्या वेळी काहीही उमगत नाही. परंतु, त्याने आत्महत्या केल्यावर समजते, तो असे का म्हणत होता. आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती अशी दिसत असेल तर तिला ताबडतोब उपचार करून घेण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून तिचा जीव वाचू शकेल. दुसरा भाग म्हणजे या घटनेत त्या व्यक्तीचा काही हेतू असावा आणि ती घटना नियोजित केली असावी. अशा व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्त्वाचा दोष असू शकतोे. अधीर व रागीट असे गुणधर्म असलेल्या या व्यक्तीला मी केलेल्या कृत्याचे काय पडसाद उमटतील, याची कल्पना-जाणीव नसते. या घटनेत गुन्हा करणाऱ्या या व्यक्तीमध्ये उदासीनता हा आजार असू शकतो. त्यासोबतही कदाचित त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला असेल, जर कौटुंबिक वाद झाला असेल, तर या वादातून कुटुंबातील व्यक्ती माझ्यावर हल्ला करतील. त्याआधीच मी त्यांना मारेल, अशी गैरसमजूत निर्माण होईल. हा शंकेचा मानसिक आजार असू शकेल. तिसरी पद्धत म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती. त्यात भांडणे, मारामारी, हत्या करणे अशा घटना त्या व्यक्तीकडून घडतात. मात्र, आत्महत्येचा मार्ग ती व्यक्ती अवलंबत नाही. (शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे)>> घटनाक्रमरविवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास घोडबंदर रोडवरील वडवली गावात १४ जणांची हत्या करून हसनैन वरेकर या माथेफिरूने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कर्णोपकर्णी पसरली. तसे, या भागाकडे रुग्णवाहिका, पोलिसांची सायरन वाजवत जाणारी वाहने आणि वृत्तवाहिन्यांच्या व्हॅन्स हे चित्र पहाटेपासूनच पाहायला मिळत होते.पहाटे ३.१५ वा. सुबियाचा आवाज ऐकल्यानंतर तिला आजूबाजूच्या रहिवाशांनी नातेवाईकांच्या मदतीने घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून बाहेर काढले. ३.३० वा. या प्रकरणाची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे हे आपल्या नाइट राउंडच्या कर्मचाऱ्यांसह तिथे पोहोचले. या गावात तळ अधिक एक मजल्याचे जामा मशिदीसमोरच हे घर आहे. घटनास्थळी हॉलमध्येच आई, वडील दोन बहिणी आणि त्यांची तीन मुले असे सात मृतदेह, बेडरूममध्ये बत्तूल ही अविवाहित बहीण, तर वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये त्याची पत्नी, दोन मुली गळ्यावर वार केल्याच्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हसनैन वरच्या मजल्यावर जाण्याच्या जिन्यातच गळफास लावलेल्या अवस्थेत होता. गाद्यांवर रक्ताचे थारोळे पडलेले होते. तर, एकामागून एक मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या घराला शवागाराचे स्वरूप आले होते.घटनास्थळी ३.३० ते ३.४५ वा.च्या सुमारास पोहोचलेले निरीक्षक टेळे यांनाही या घरात एकाच वेळी नेमके किती खून झाले, याचा सुरुवातीला अंदाजच आला नाही. आधी नातेवाईक आणि शेजारच्यांनी सुबियाला बाहेर काढल्यानंतर हॉलमध्ये हे मृतदेह त्यांनी एकाच वेळी पाहिले. त्यापैकी दोघांचा खून झाल्याचे सुरुवातीला त्यांना वाटले, तर इतरांची काही प्रमाणात तडफड सुरू असल्याने ते जिवंत असल्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे यांना साहेब दोन खून झालेत, अशी माहिती दिली. त्यानंतर, दोन नाही तीन. नंतर पाच. त्यानंतर, त्यांचा काहीच फोन न लागल्याने शेवटी चंदनशिवेही स्वत: घटनास्थळी ४.१५ वा. पोहोचले. त्यांनाही घटनास्थळाचे चित्र पाहून धक्काच बसला. त्यानंतर, ५.३० वा.च्या सुमारास सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर आणि त्यापाठोपाठ पोलीस आयुक्त परमवीर सिंग हेही आले. सुरुवातीला नक्की काय, कसे, हत्याकांड घडले, याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची छाननी केली. पहाटे ५ पासून एकापाठोपाठ एक असे १५ मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. साधारण ५.३५ च्या दरम्यान ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साधारण ६.३० वा.पर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढले गेले. अंगावर फक्त चड्डी असलेल्या अवस्थेत हसनैनचा मृतदेह शेवटी काढण्यात आला.या हत्याकांडाचे लाइव्ह वार्तांकन करण्यासाठी साधारण ५.३० ते ६ पासून मुंबईतून वृत्तवाहिनीचे कॅमेरामन आणि प्रतिनिधी पोहोचले होते. पाहतापाहता सकाळी ८ पर्यंत या संपूर्ण परिसरात ओबी व्हॅनचा गराडा पडला होता तर दुसरीकडे जामा मशिदीच्या बाजूलाच असलेली हसनैनची सासूरवाडी, तसेच बहिणींच्या सासरच्या नातलगांनी धाव घेतली होती. यामध्ये कोपरखैरणे, माथेरान, मुंबई, भिवंडी आदी भागांतून नातेवाईक आले होते. यामध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.
भाईजान ने सबको काटा... बचाव, बचाव...
By admin | Published: February 29, 2016 4:39 AM