ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. सुप्रिम कोर्टाचा निर्णयाच्या प्रतिक्षेत असतानाच त्यांच्या निधनामुळे आज एका संघषार्चा अस्त झाला, अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
भैयालाल भोतमांगे भंडारा येथील म्हाडा कॉलनीत निवासाला होते. कॉलनीपासून काही अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजता नेहमीप्रमाणे ते जेवणासाठी घरी आले. जेवणानंतर त्यांना अचानक उलटी झाली. प्रकृती खालवत असल्याचे पाहून त्यांना जवळच्या डॉक्टरांना दाखविण्यात आले. त्यांनी लागलीच नागपुरात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेने त्यांना काँग्रेसनगर येथील एका खासगी इस्पितळात दुपारी २.३० वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु २.४५ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची देखभाल करणा-या शिलाबाई उपस्थित होत्या.
२००६ मध्ये भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या खेड्यात भोतमांगे कुटुंबाचे निर्घृण हत्याकांड घडले होते. या हत्याकांडातील एकमेव साक्षीदार असलेल्या भैयालाल यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हत्याकांडात भैयालाल यांची पत्नी, दोन मुले, मुलगी अशा चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या ११ वर्षांपासून न्यायासाठी धडपड करीत असतानाच भैयालाल यांनी जगाचा निरोप घेतला.