मुंबई : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी आत्महत्या केली. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपविले. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेनंतर विद्यार्थीनींनी घाबरून शिक्षण सोडू नये, यासाठी भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याकडून विद्यार्थिनींना शेजारील कुळधरण या गावातील शाळेत जाण्या-येण्यासाठी सर्वोदय परिवार इंदौरच्यावतीने अद्यावत अशा चार मिनी स्कूल बस देण्यात आल्या.
सर्वोदय परिवाराच्यावतीने विद्यार्थिनीसाठी दिलेल्या चारही मिनी स्कुल बसचा सर्व खर्च संस्था करत आहे. मात्र, या बसेसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडित मुलीच्या आईच्या अध्यक्षतेखालील स्थानिक समितीकडे सोपविण्यात आली आहे. या समितीत स्थानिक सहा महिलांचा समावेश आहे. या अत्याधुनिक बसमध्ये सीसीटीव्ही, व्हिडिओ रेकॉर्डर, जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या शिवाय गाड्यांच्या चालक व वाहक महिला आहेत. कोपर्डीप्रमाणेच दोन मिनी स्कूल बसेस बीड आणि एक बस उस्मानाबादला देण्यात आली आहे.
भय्यूजी महाराज यांनी कोपर्डीच्या घटनेनंतर विद्यार्थीनींनी घाबरून शिक्षण सोडू नये, यासाठी भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला होता. तसेच, कोपर्डी येथील पीडित मुलीचे कुटुंबीयांना आधार दिला होता. कुटुंबीयांना असुरक्षित वाटत होते. त्यांना स्वास्थ्याची गरज होती. पीडितेचे कुटुंबीय माझ्यासोबत राहतात. या कुटुंबाला बाहेरच्या जगाची माहिती नाही. त्यांची असुरक्षितता दूर व्हावी, सामान्य वातावरण त्यांच्यात असावे, असे मला वाटते. कोपर्डीच्या घटनेसारखा प्रसंग माझी बहीण, मुलगी यांच्याबाबत घडला असता तर काय झाले असते हा विचार मी करतो. कुठल्याही अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त कुटुंबाला मदत करण्याची आपली भूमिका, वृत्ती आहे, असे भय्यूजी महाराज यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.