नवी दिल्ली/मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या जिवाला धोका असून, सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे त्यांनी टाळावे, अशा आशयाच्या सूचना मुंबई पोलिसांनी त्यांना दिल्या आहेत. किंबहुना त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे पोलीस सह-आयुक्तांनी मान्य केले. या बंधनांमुळे नेमाडे जणू नजरकैदेत अडकले आहेत.दिल्लीत आणि महाराष्ट्रात लेखक आणि साहित्यिक वर्तुळात सध्या कमालीची अस्वस्थता आहे. त्यात नेमाडेंसारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यालाही सार्वजनिक कार्यक्रम टाळणे भाग पडत असल्यास महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नेमके कोण सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अलीकडेच मान्यवर साहित्यिकांनी मोदी सरकारचा वैचारिक प्रतिकार करण्यासाठी पुरस्कार परत केले अथवा आपल्या पदांचे राजीनामे देऊ न साहित्य अकादमीशी नाते तोडले. पुरस्कार परत करण्याचे लोण त्यानंतर महाराष्ट्रातही पोहोचले. पण नेमाडे यांना याच्या बऱ्याच आधी मुंबईच्या पोलीस यंत्रणेकडून सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सुचना मिळाल्याने त्याचे गांभीर्य अधिक आहे. साहित्यिकांचा आवाज बंद करण्यासाठी किती जणांचे सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या जाणाार आहेत,हा नवा प्रश्न त्यामुळे उद्भवला आहे.साहित्यिक वर्तुळातल्या एका जेष्ठ मित्राकडून शुक्रवारी सकाळी ही माहिती मिळाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने सर्वप्रथम नेमाडे यांच्या घरी फोन लावला. त्यांच्या पत्नीने तो उचलला. नेमाडेंनी सध्या सार्वजनिक कार्यक्रम स्वीकारणे बंद केले आहे काय, असे विचारता ‘सध्या ते फारसे बाहेर पडत नाहीत. त्यांची भाषणे, कार्यक्रम इत्यादीवर बंदी आहे’, असे त्रोटक उत्तर मिळाले. त्यांना कोणी जीवाची धमकी दिली आहे काय? असा पुढला प्रश्न विचारला असता ‘या विषयावर वृत्तवाहिन्या अथवा वृत्तपत्रांच्या कोणत्याही प्रतिनिधीशी काहीही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले आहे’, असे झटपट उत्तर देत त्यांनी फोन बंद केला. नेमाडेंचा मोबाईल फोन लावण्याचा प्रयत्न केला तर हा फोन सध्या उपलब्ध नाही, असे एकच उत्तर सातत्याने ऐकायला मिळाले.नेमाडेंच्या जीवाला धोका असल्याची बातमी खरी आहे काय? नेमाडेंनी सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अशा आशयाच्या सुचना पोलीस यंत्रणेमार्फत त्यांना देण्यात आल्या आहेत काय? याची चौकशी केल्यानंतर नेमाडेंना धोका संभवतो, याची कल्पना असल्याने त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे मुंबईचे पोलीस सह-आयुक्त देवेन भारती यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नेमाडेंच्या जीवाला कोणापासून धोका आहे, आणि त्यांना काय स्वरुपाचे संरक्षण दिले आहे, या प्रश्नावर भारती म्हणाले, सप्टेंबर महिन्यात नेमाडेंना धमकीचे पत्र आले होते. ते गांभीर्याने घेऊन त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. पण त्याची वर्गवारी वा अन्य तपशील देता येणार नाही, असेही भारती यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>>लेखक, साहित्यिकांवरील हल्ले, दादरीचे हत्याकांड इत्यादी प्रकरणांत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ साहित्यिकांनी नोंदविलेला निषेध मोदी समर्थकांनी हसण्यावारी नेला. इतकेच नव्हे, तर काँग्रेस सरकारच्या काळात अशा घटना घडल्यावर या साहित्यिकांचा धर्म कुठे गेला होता, असा सवालही उपस्थित करण्यात आला. या धमकीमागे नेमके कोण आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
भालचंद्र नेमाडे पोलीस संरक्षणात
By admin | Published: October 17, 2015 3:27 AM