भाजप प्रवेशाची संधी हुकलेले भालके काँग्रेसच्या नाराजीमुळे अडचणीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:19 AM2019-10-09T11:19:30+5:302019-10-09T11:22:34+5:30
शिंदे यांची नाराजी असताना काँग्रेसची मदत मिळणे भालके यांच्यासाठी जरा कठिण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भालके यांच्यासाठी विजयाचा मार्ग वाटतो तितका सोपा नक्कीच नाही.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याला प्राधान्य दिले. भाजपने देखील विरोधी पक्षातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात भरती केली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते भाजपमध्ये गेले. परंतु, काही नेत्यांना भाजपमधील अंतर्गत विरोधामुळे पक्षात आहे तिथेच थांबावे लागले. अशा नेत्यांची आता चांगलीच गोची झाली असून यापैकीच एक असलेले पंढरपूरचे आमदार भारत भालके पेचात सापडले आहेत.
भारत भालके 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडून आले होते. परंतु, भालके यांच्या मतदार संघातून दरवेळी काँग्रेसनेते सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर असे. त्यामुळे भालके यांच्या कामाच्या पद्धतीवर शिंदे नाराज होते. त्यातच भालके यांनी देखील भाजपप्रवेशाच्या हालचाली सुरू असताना शिंदे यांच्यावर टीका केली होती.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भालके यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र परिचारकांच्या तीव्र विरोधामुळे भालके यांचा भाजप प्रवेश रद्द झाला. तर सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांविषयीच्या भावनेमुळे भालके काँग्रेसपासूनही दुरावले. अशा स्थितीत त्यांनी घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी युती असल्यामुळे भालके यांना विजयासाठी काँग्रेसच्या मतांची गरज भासणार आहे.
दरम्यान शिंदे यांची नाराजी असताना काँग्रेसची मदत मिळणे भालके यांच्यासाठी जरा कठिण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भालके यांच्यासाठी विजयाचा मार्ग वाटतो तितका सोपा नक्कीच नाही.