गजानन मोहोडअमरावती : स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जाते. राज्यात यापूर्वी पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार २ आॅक्टोबर २०१४ नंतर शौचालय बांधून त्याचा वापर करणा-यांना १२ हजार व त्यापूर्वी बांधकाम झालेल्या शौचालयांना ४,५०० रुपये अनुदान दिले जाते, तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, स्त्री कुटुंबप्रमुख व अपंग यांना प्राधान्य दिले जाते. सोमवारी विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अभियानाच्या राज्यस्तरीय गुणांकनात भंडारा जिल्हा अव्वलस्थानी आहे. या जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६ कुटुंबसंख्या आहे. यामध्ये पायाभूत सर्वेक्षणानंतर ८६ हजार ५५४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आलीत. आता जिल्ह्यात एकूण २ लाख ८ हजार १७९ घरामध्ये शौचालये आहेत. त्यामुळे येथे शौचालय बांधकाम शिल्लक नसल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या जिल्हास्तरीय गुणांकनाच्या अहवालात स्पष्ट आहे. याच अहवालात यवतमाळ पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण कुटुंबसंख्या ४ लाख २६ हजार ४४८ आहे. ३५७ सार्वजनिक शौचालये आहेत. पायाभूत सर्वेक्षणानंतर १ लाख ९५ हजार ६८२ शौचालये बांधण्यात आली. सद्यस्थितीत २ लाख ९५ हजार ५२० कुटुंबाकडे शौचालय आहे, तर १ लाख ३० हजार ९२८ कुटुंबाकडे नसल्याचे या अहवालात स्पष्ट आहे.
वेळेवर निधीच उपलब्ध नाही-स्वच्छ भारत योजनेंतर्गत शौचालयाचा निधी बांधकामानंतर मिळतो. मात्र, अनेक कुटुंबांना शौचालयाचे बांधकामे केल्यानंतरही निधी मिळालेला नाही. १२ हजार रुपयांच्या तुटपुंज्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम होणे शक्य नाही. त्यात रेतीघाटाचा हर्रास नसल्याने महागडी रेती; सिमेंट व साहित्याचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पदरमोड करावी लागत आहे.राज्यातील जिल्हानिहाय रँकिंग -स्वच्छ भारत मिशनच्या गुणांकनानुसार भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, अकोला, बीड, लातूर, हिंगोली, अमरावती, अहमदनगर, वाशिम, गडचिरोली, परभणी, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नांदेड, बुलडाणा, नंदुरबार, जळगाव व शेवटच्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे.