घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक... सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 12:02 PM2021-01-09T12:02:33+5:302021-01-09T12:38:17+5:30
Bhandara Fire : राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे.
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
याचबरोबर, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.