भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीला ईव्हीएमच्या बिघाडाचे ग्रहण लागलेले आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजतापर्यंत केवळ १३.९० तर दुपारी १ वाजतापर्यंत केवळ २० टक्के मतदान झाले आहे. दुपारी ४४ अंश तापमानामुळे मतदान केंद्रावर कुणीही दिसत नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील २१० ते २२५ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या असून काहींमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु २,१४९ मतदान केंद्रासाठी केवळ पाच अभियंते असून त्यांची पळापळ सुरू आहे. याची राष्ट्रवादी व भारिपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार करून मतदानाची वेळ वाढवून मागितली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे अत्यल्प प्रतिसाद मिळत असून सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी मतदानाची वेळ ७ वाजता करण्यात आली. परंतु ९ वाजतापर्यंत दोन तासात केवळ ५.९८ टक्के मतदान झाले. वाढत्या तापमानामुळे मतदानासाठी कुणी फारसे बाहेत पडत नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली होती. आज सकाळी राष्ट्रवादीचे धनंजय दलाल यांनी हा सर्व प्रकार जिल्हाधिका-यांना भेटून सांगितला. गोंदिया जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात ११० ते १२५ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंभली, आतेगाव, मोहाडी तालुक्यांतील ताडगाव, मोहगाव देवी येथे दोनदा मशिन बंद पडली. तुमसर तालुक्यातील मांढळ, खापा, हिंगणा, खरबी, पवनी तालुक्यातील धानोरी, सिंदपुरी, रूयाळ, बेटाळा, शिंगोरी, लाखांदूर तालुक्यातील किन्हाळा, चिंचोली, खैरना, मासळ, मोहरणा, डोकेसरांडी, मांढळ, पारडी, मुरमाडी, पाहुणगाव, पिंपळगाव, मेंढा, किरमटी, राजनी, टेंभरी येथील ईव्हीएममध्ये बिघाड राहिला.भंडाराजवळील खोकरला येथील मतदान केंद्रावरील मशीन बिघडल्याने मतदारांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना या गैरप्रकाराची माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी काळे यांनी याची दखल घेऊन दुस-या मशिनची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित मतदान केंद्राधिका-यांना देणार असल्याचे सांगितले. अशाच तक्रारी सर्वच १५ ही तालुक्यातून येत आहेत. वाढत्या तापमानामुळे ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा बचाव निवडणूक अधिका-यांकडून केला जात आहे. याची निवडणूक आयोगाकडून चाचणी का? घेण्यात आली नाही. चाचणी घेतली असेल तर दोष कसा आढळून आला, असा प्रश्न माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
ईव्हीएम बंद, मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची पालकमंत्री बावनकुळे यांची मागणीभंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोट निवडणुकीत आज होत असलेल्या मतदानात ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी अनेक मतदान केंद्रावरून येत आहेत. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. नादुरुस्त ईव्हीएम मशीन त्वरित दुरुस्त करून मतदानाची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून केली आहे