राजूर (जि. अहमदनगर) : वीजबिलाची साडेबारा लाख रुपये थकबाकी न भरल्याने बुधवारी रात्री महावितरणकडून भंडारदरा धरणाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावर अद्याप काहीच तोडगा निघाला नसल्याने दोन दिवसांपासून धरण अंधारात आहे़ परिणामी याची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे़ महावितरणने वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली न गेल्याने अखेर बुधवारी रात्री धरणाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. गुरुवारी धरणाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन पुरवठा सुरू करण्याबाबत विनंती केली. पाटबंधारे विभागाकडे वीजबिलासाठीचे अनुदान अद्याप जमा झाले नसल्याने हा विलंब होत आहे. परंतु एक-दोन दिवसांत ते जमा होईल. त्यानंतर बिलाची रक्कम अदा करू. सध्या धरण अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
भंडारदरा धरण अंधारात!
By admin | Published: January 16, 2015 5:56 AM