जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी ४.२१ वाजता जळगावमधील जैन हिल्सवर शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ सुपुत्र अशोक जैन यांनी मुखाग्नी दिला. या वेळी त्यांचे पुत्र अनिल, अजित व अतुल जैन तसेच दलिचंद जैन व कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे देश-विदेशातील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वज ठेवलेले जैन यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या चौथऱ्यानजीक आणण्यात आले. यानंतर बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून सलामी देण्यात आली. तसेच शहीद, देशभक्तांच्या निधनानंतर वाजविण्यात येणारी धून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी वाजविली. या वेळी जैन हिल्स परिसर नि:शब्द झाला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, सेबीचे माजी अध्यक्ष डी.आर. मेहता, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, अमरावती महसूल विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर आदी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच जिल्ह्यासह मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी ठिकाणचे शेतकरी, जैन यांचे चाहतेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)रुग्णालय, जल व कृषी विद्यापीठ उभारणारपंचक्रोशीतील लोकांसाठी सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय उभारण्याची भंवरलाल जैन यांची इच्छा होती. त्यांच्या स्मरणार्थ आता आम्ही ते उभारू, असे त्यांचे पुत्र अनिल जैन यांनी सांगितले. यशिवाय भाऊंचे जन्मगाव असलेल्या वाकोदसह जिल्ह्यातील ५० गावांमध्ये पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान पोहोचविण्याचे तसेच जल व कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार देणार असल्याचेही अनिल जैन यांनी सांगितले.
भंवरलाल जैन अनंतात विलीन
By admin | Published: February 28, 2016 1:58 AM