नाशिक : येथील महाकवी कालिदास कलामंदिरातील अव्यवस्था, अस्वच्छतेचा फटका शनिवारी थेट प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यालाही बसला. कालिदासमध्ये धड बसण्यासाठीही जागा नसल्याचे आणि तेथे कचरा साठलेला पाहून संतापलेल्या भरतने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडेच तक्रार केली. विशेष म्हणजे एवढा गोंधळ होऊनही ‘कालिदास’च्या व्यवस्थापकांचा फोन मात्र ‘स्वीच आॅफ’च होता.भरत जाधवच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकाचा सायंकाळी ६ वाजता ‘कालिदास’मध्ये प्रयोग होता. त्यानुसार भरत कालिदासमध्ये पोहोचला; मात्र तेथे आधीच सुरू असलेला कार्यक्रम बराच लांबला. दुपारी दोन वाजता येणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीष महाजन तब्बल दोन तास उशिरा म्हणजे चार वाजता अवतरले. स्वागत-सत्कार होईपर्यंत साडेपाच वाजले. नाटकाची वेळ होत असल्याने भरत अस्वस्थ झाला. त्याने व्यासपीठावर ‘एन्ट्री’ मारत आयोजकांना घड्याळ दाखवले आणि वेळेची जाणीव करून दिली. त्यामुळे माजी आ. वसंत गिते यांनी आयोजकांना बाहेर बोलावून कार्यक्रम आटोपता घेण्यास सांगितले. काही काळ विश्रांतीसाठी ‘कालिदास’च्या वरच्या मजल्यावर आलेला भरत तेथील खोलीत साठलेला कचरा, उष्टे अन्न पाहून पडल्याचे पाहून आणखी संतापला. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे तेथे आले. भरतने त्यांना वस्तूस्थिती दाखवली. सोनवणे यांनी कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल ‘स्वीच आॅफ’ होता. (प्रतिनिधी)
नाशिकच्या नाट्यगृहातील अव्यवस्थेने भरत जाधव संतापला!
By admin | Published: June 14, 2015 1:54 AM