ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 09:38 PM2024-03-17T21:38:52+5:302024-03-17T21:39:59+5:30
'नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही.'
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. आम्ही एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीविरोधात लढत नाही आहोत. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. या शक्तीने देशातील सर्व केंद्रीय संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.
LIVE: Bharat Jodo Nyay Manzil - INDIA Rally in Mumbai, Maharashtra. https://t.co/WO9HpCgAHf
— Congress (@INCIndia) March 17, 2024
नरेंद्र मोदी फक्त मुखवटा...
राहुल गांधी पुढे म्हणतात, नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहेत. ज्याप्रकारे बॉलिवूडचे हिरो दररोज एक रोल प्ले करतात, त्याप्रमाणे मोदी दररोज काही ना काही गोष्टी करत असतात. ही शक्ती त्यांच्याकडून ते करुन घेते. नरेंद्र मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत. आज देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक दिवसांचा वेळ लागतोत. पण, सरकारने एका लग्नासाठी फक्त दहा दिवसात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. यात काही चूक नाही, पण अशीच तत्परता देशातील इतर ठिकाणी दाखवा ना. देशातील ठरावीक व्यक्तींसाठी कायदे केले जातात.
आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात
आज देशात 50 टक्के लोक मागास आहेत. 15 टक्के दलित, 8 टक्के आदिवासी, 15 मायनोरिटी आहेत. पण, मीडियातील मालकांमध्ये एकही दलित, मागास किंवा आदिवासी नाही. त्यांची चूक नाही, कारण तेदेकील मुखवटे आहेत. देशातील उद्योग क्षेत्रातही कोणीच दलित, मागास, आदिवासी नाही. आज केंद्रातील 90 अधिकारी या देशाला चालवतात, त्यात फक्त 3 मागास, 3 दलित आणि एक आदिवासी आहे.
EVM शिवाय निवडणूक जिंकू शकत नाही
नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही. मी आयोगाला म्हणालो होतो की, विरोधकांना ही मशीन उघडून दाखवा. या मशीनमध्ये मत केल्यावर जो कागद निघतो, त्या कागदाची मोजणी करा. पण, आयोगाने कागद मोजण्यास नकार दिला. हा देश काही निवडक उद्योगपतींच्या हातात गेलाय आणि मोदी तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करातत. आज देशात चाळीस वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. पण, मीडियात तुम्हाला हे कधीच दाखवले जाणार नाही. आज देशात चीनमधून आलेल्या गोष्टी विकल्या जातात. याचा फायदा चीनला आणि भारतालील ठराविक उद्योगपतींना होतो.
इलेक्टोरल बाँड्सद्वारे खंडणी सुरू
सध्या देशात इलेक्टोरल बाँड्सद्वारे खंडणी घेतली जात आहे. आधी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात, मग कंपनीकडून देणगी घेतातते. एखाद्या कंपनीने देणगी दिली नाही, तर कंपनीविरोधात ईडी सीबीआय लावली जाते आणि खंडणी वसुल केली जाते. या देशात फक्त ठराविक 20-25 कंपन्यांचे राज्य असावे, अशी या शक्तीची इच्छा आहे. या शक्तीला देशातील लहान उद्योग नष्ट करायचे आहेत. जे लोक या देशाला पुढे आणू शकतात, हे त्यांनाच नष्ट करू पाहत आहेत. या शक्तीविरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागेल. तुम्ही सगळे भारत माता आहात. आमच्यासोबत देशातील तरुणांचीही जबादारी आहे. सर्वांनी सोबत येऊन या शक्तीचा सामना करायचा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.