कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 08:19 PM2024-03-17T20:19:44+5:302024-03-17T20:21:32+5:30
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सांगता होत आहे.
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या सभेला विरोधी पक्षांच्या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा उपस्थित केला. ज्या कंपन्यांचे प्रॉफिट 200 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटींचे बाँड्स कसे दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणतात, आपण सर्वांनी मिळून सरकारला याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. गृहमंत्री अमित शाह इलेक्टोरल बाँड्सवर भाष्य करतात, त्यांनी आधी याचे उत्तर द्यावे. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहनही केले. तसेच, आंबेडकरांनी मोदी का परिवार, या घोषणेवरुन पंतप्रधानांवर खासगी टीकाही केली.
तेजस्वी यादव यांचे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र
यावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत, असा घणाघात तेजस्वी यादवांनी केला. उद्धव ठाकरेंच्या नावाने मतं मागतात, शरद पवारांच्या नावाने मतं मागतात आणि भाजपशी डिलिंग करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे खोटारडे आहेत. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्ट्री आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलरही आहेत.
फारुख अब्दुल्ला यांचा EVM वर निशाणा
यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी EVM बाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी ईव्हीएमला चोर ठरवून आघाडीचे सरकार आल्यास मशीन काढून निवडणूक आयोगाला स्वतंत्र केले जाईल, असे म्हटले. तुम्हाला आपले मत वाचवायचे आहे. हे मशिन (ईव्हीएम) चोर आहे. मशीन काढून टाकण्यासाठी आम्ही खूप आवाज उठवला, पण तसे झाले नाही. 'इंडिया' आघाडीचे सरकार आले, तर मशीन काढून टाकू आणि निवडणूक आयोगाला मुक्त करू, असे ते म्हणाले.