Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. आम्ही एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीविरोधात लढत नाही आहोत. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. या शक्तीने देशातील सर्व केंद्रीय संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.
देशातील माध्यमांवर सरकारचा ताबा
ते पुढे म्हणतात, गेल्या वर्षी मी कन्याकुमारी ते काश्मीर असा 4 हजार किलोमीटर प्रवास केला. ही यात्रा आम्हाला का करावी लागली, कारण देशातील माध्यमांवर एका शक्तीने ताबा मिळवला आहे. देशातील बेरोजगारी, हिंसाचार, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, अग्नीवीरचे मुद्दे, जवानांचे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. हे सर्व मुद्दे देशासमोर आणण्यासाठी आम्हाला ही यात्रा करावी लागली. या यात्रेत फक्त राहुल गांधी नाही, तर विरोधी पक्षातील सर्व नेते सहभागी झाले होते.
राजाची आत्मा EVM, CBI आणि ED मध्येआज देशातील प्रमुख मीडियासह सोशल मीडियावरही या शक्तीचे कंट्रोल आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव टाकला जातोय आहे. आज आम्ही विविध पक्षातील नेते एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व एका पक्षाविरोधात किंवा नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तिविरोधात लढत आहोत. आजच्या राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे, देशातील प्रत्येक सरकारी संस्थेत आहे. या शक्तीने ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, अशा सर्व प्रमुख संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत.
अशोक चव्हाणांचा नाव न घेता उल्लेखया महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेते काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेले. जाण्यापूर्वी ते माझ्या आईसमोर रडले. त्यांनी सांगितले की, मला लाज वटत आहे, पण माझ्यात या लोकांविरोधात लढण्याची हिम्मत नाही. मला तुरुंगात जायचे नाही, त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. हे एकच नाहीत, तर अशाप्रकारे हजारो लोकांना घाबरवले गेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीतील लोकही अशाचप्रकारे भाजपात गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.