नाशिक: विरोधकांना सीबीआय, ईडीचे भय दाखवून विविध मार्गाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष असून, या पक्षाने देशातील लोकशाही, संविधान व माध्यमांनाही धोक्यात आणले आहे. देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर ओसीबींनी एकत्र येऊन संघटन मजबूत केले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र मंथन शिबीरात पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. भा. ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅ. अजयसिंह यादव होते.
यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, "देश स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिले. स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले व सर्व समाजघटकांना एकत्र ठेवले. त्यानंतर मात्र गेल्या आठ वर्षात भाजपाने ओबीसींना जात-पातीत भांडणे लावले, धर्मांमध्ये फूट पाडली. त्यातूनच लोकशाही व्यवस्था, देशाचे संविधान धोक्यात आणले. माध्यमांची गळचेपी करून, प्रशासकीय यंत्रणाही संपविली." याशिवाय, देशात असेच सुरू राहिले तर अराजकता निर्माण होईल अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली.