मुंबई : ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना कोणी दिला़?, देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण? असा सवाल करत, विरोधकांनी विधान परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी बाकांवरूनही तितकेच चोख प्रत्युत्तर आल्याने, सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’च्या वादाबाबत काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, सभापती रामराजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी गदारोळाला सुरुवात केली. त्यामुळे अखेर सभापतींनी दोन मिनिटे सदस्यांना बोलण्याची परवानगी दिली. राज्यात भेडसावणारे प्रश्न सोडवण्यात विफलता आल्यामुळे, अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दत्त यांनी केला, तर एका वाक्याने नागरिकत्व ठरणार असेल, तर सर्वात आधी एमआयएमच्या ओवेसीवर सरकारने कारवाई करायला हवी होती, असे मुंडे म्हणाले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.सभागृहात बहुमत असल्याचा राजकीय फायदा उठवून कुठल्याही विषयावरून गोंधळ घालून, राज्यात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करू नका, असे गिरीश बापट म्हणाले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री हे सभागृहातील गोंधळ मिटवण्यापेक्षा गोंधळ वाढवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
‘भारतमाता’वरून विधान परिषदेतही गदारोळ
By admin | Published: April 05, 2016 2:28 AM