निवडणूक उपसमितीच्या बैठकीत चर्चाअकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मुद्द्यावर भारिप बहुजन महासंघ निवडणूक निरीक्षक उपसमितीची बैठक रविवारी घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षनिष्ठा आणि ‘सोशल इंजिनिअरिंग’वर भर देण्यात आला.अकोला महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढविण्याची तयारी भारिप-बमसंने सुरू केली आहे. निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांकडून प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार शहरातील २० प्रभागातून ३१८ इच्छुक उमेदवारांची नावे भारिप-बमसंच्या निवडणूक निरीक्षक उपसमितीकडे प्राप्त झाली. प्राप्त नावांमधून उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया उपसमितीकडून सुरू करण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या निवडणूक निरीक्षक उपसमितीच्या बैठकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार निश्चित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांची पक्षनिष्ठा, जातीय समीकरण, निवडून येण्याची क्षमता इत्यादी बाबींचा सखोल विचार करून उमेदवार निश्चित करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीचे प्रमुख बालमुकुंद भिरड, समितीचे सदस्य माजी आमदार हरिदास भदे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, आसीफ खान व डॉ. प्रसन्नजित गवई यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षाचे ५२ उमेदवार निश्चित करण्यात आले.निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा मुहूर्त मात्र उपसमितीकडून अद्याप निश्चित करण्यात आला नाही.----------५२ उमेदवार निश्चित; यादीची प्रतीक्षा!भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून विविध प्रभागातून ५२ उमेदवारांची नावे रविवारी रात्रीपर्यंत निश्चित करण्यात आली. त्यामध्ये २२ मुस्लीम उमेदवार आणि विविध प्रवर्गातील ३० उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ५२ उमेदवार निश्चित करण्यात आले असले तरी, निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी उपसमितीकडून अद्याप जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे केव्हा जाहीर करण्यात येणार, याबाबत पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
----------