संतोष वानखडे /ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24- गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदारीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाने शौचालय नसणाऱ्यांच्या घरासमोर भजन-कीर्तन करण्याचा आगळावेगळा जनजागृतीपर उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत १० ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, एकूण २१९ गावांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वाशिम जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात शौचालय बांधकामाचे एकूण उद्दिष्ट ३५ हजार ८६५ असून, उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आतापासून जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शौचालय नसणाऱ्यांच्या घरांसमोर भजन-कीर्तन करणे, शौचालय नसणाऱ्या व्यक्तिंना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर ह्यविना शौचालयह्ण असा शिक्का मारणे आदी उपक्रम सुरू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी तुझं गावच नाही का तीर्थ ? या उपक्रमाने हगणदरीमुक्तीच्या मोहिमेचा शुभारंभ केला.
यावर्षी स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्ह्यातील २१९ गावांची निवड करण्यात आली. या गावांचा समुदाय संचलित हगणदरी निर्मुलन कृती आराखडा (ओडीईपी) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून २३ जुलैपर्यंत ५० ग्रामपंचायतींनी हा आराखडा तयार केला. जनजागृतीपर जिल्हास्तरावर स्वच्छता दिंडीसह एकूण नऊ चमू तयार करण्यात आल्या. स्वच्छता दिंडीतील वारकरी हे गावोगावी जाऊन आपल्या घरातील माय- माऊलीला हगणदारीच्या नरकात पाठवू नका, असे भावनिक आवाहन करून शौचालय नसणाऱ्यांच्या घरासमोर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम घेत आहेत.ह्यआपलं गाव स्वच्छ ठेवाह्ण, शौचालयाचा वापर करा, उघड्यावर शौचास बसू नका, तुझं गावच नाही का तीर्थ- आरे कशाला रिकामा फिरतं आदी प्रकारच्या घोषणांनी शौचालय बांधकाम व हगणदारीमुक्तीचा संदेश दिला जात आहे.