मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर-धक्के बसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
यातच आता राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
भास्कर जाधव यांनी शुक्रवारी औरंगाबादला जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित होते.
दरम्यान, भास्कर जाधव आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे. भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेतच होते. पक्षांतर्गत राजकारणामुळं त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता.