मुंबई : शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, भाऊ चौधरी हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात होते.
संजय राऊत यांनी ट्विट करायच्या आधी त्यांचे निकटवर्तीय नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे संजय राऊत यांच्या जवळचे काही मोजकेच नेते आहेत. यामध्ये बाळा सावंत, भाऊ चौधरी आणि बंधु सुनिल राऊत यांच्या नावाची चर्चा झाली. तसेच, नाशिकचा कोणी नेता आहे का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. पण, संजय राऊत यांनी ट्विट केल्याने भाऊ चौधरी हेच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
संजय राऊत यांनी भाऊ चौधरी यांच्या हकालपट्टी संदर्भात ट्विट केले आहे. "शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे.", असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाऊ चौधरी हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ते उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते, तसेच ते संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. संजय राऊत यांच्या कोर्ट कामकाजातील क्रमांक एकची व्यक्ती म्हणून भाऊ चौधरी यांच्याकडे बघितले जात होते. भाऊ चौधरी हे कायम संजय राऊत यांच्यासोबत असत. कोणताही प्रवास अथवा कार्यक्रमाला भाऊ चौधरी संजय राऊत यांच्यासोबत जात होते. शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी यापेक्षा संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
दरम्यान, शिंदे गटाकडून नक्की कोण प्रवेश करणार, याबाबत अद्याप सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. मात्र, शिंदेंचे खास प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी कवितेतून सूचक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "सकाळच्या भोंग्याला आज बसणार आहे झटकाबसेल पुरता आवाज असा दाबलाय आम्ही खटका
अशी कळ उठेल कीब्रह्मांड आठवेलभोंगा मग दाही दिशांनाचमच्यांना पाठवेल
सांगून गेलीत मोठी माणसंसदा सतर्क असावेआपले जेवढे तोंड तेवढेच घास घ्यावे.