मुंबई - राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने भाऊबिजेच्या दिवशी म्हणजे ३ नोव्हेंबरला ३० कोटी ८३ लाख रुपयांची कमाई केली आहे. राज्यभरातील ३१ विभागांनी ९६.१७ टक्के उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य केले असून पुणे विभागाने २ कोटी पाच लाख रुपयांची सर्वाधिक कमाई केल्याचे महामंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. मात्र गेल्यावर्षी भाऊबिजेच्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ३१ कोटी ६० लाख इतका महसूल मिळाला होता. यावर्षी त्यामध्ये सुमारे ७७ लाखांची घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने २६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान दररोज सुमारे ५०० याप्रमाणे १२ हजार अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात दिवाळी पाडवा आणि भाऊबीज म्हणजेच शनिवार व रविवारी असे सलग सुट्टीचे दिवस साधून नागरिकांनी प्रवासाचे नियोजन केले होते. परंतु शनिवारी रात्री मुंबईमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, एसटीचा दररोजचा खर्च सुमारे २९ कोटी रुपये असून उत्पन्न मात्र २७ कोटींच्या आसपास मिळत आहे. ढिसाळ नियोजनामुळे आणि नवीन गाड्यांच्या वितरणास होत असलेल्या विलंबामुळे महामंडळ बुडीत चालली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना गाड्यांअभावी त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
साध्या गाडीने प्रवास!शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल आगारामध्ये कित्येक प्रवासी गाड्यांअभावी ताटकळले होते. या आगारातून रात्री १० ची सातारा एसी शिवशाही एसटी रात्री १२:४५ ला, तर रात्री १२ ची एसटी १:४५ ला सुटली. परंतु ती पनवेल आगारामध्ये बंद पडल्याने एसी गाडीच्या प्रवाशांना नाइलाजाने साध्या गाडीमधून प्रवास करावे लागले. दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली, परंतु त्यांची पूर्तता केली नाही.