Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एका नेत्याने जय महाराष्ट्र केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याचे सांगत माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वैजापूरचे माजी आमदार असलेल्या भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असून, तयारीही करत आहेत. ठाकरेंकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांनी राजीनामा दिला.
भाऊसाहेब चिकटगावकर काय म्हणाले?
"मी पक्षासाठी दोन वर्षांपासून काम करतोय. मात्र, ते (उद्धव ठाकरे) नवख्या उमेदवाराला तिकीट देणार असल्याचे समजते. मग या पक्षात राहून फायदा काय?", अशी नाराजी चिकटगावकरांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले.
शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी?
भाऊसाहेब चिकटगावकर पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे. २०१४ ते २०१९ या काळात भाऊसाहेब चिकटगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. २०१९ मध्ये वैजापूर विधानसभेची जागा त्यांनी पुतण्यासाठी सोडली होती.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे पक्ष फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर चिकटगावकर यांनी ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता.