मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, असे आपल्या मनात चालले होते. तेव्हा महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचीच हवा दिसत होती आणि पुढे आमदारकीच्या निवडणुकाही होत्या. मात्र, आपण भाऊसाहेबांमुळे पवारांसोबत राष्ट्रवादीत जाऊ शकलो नाही आणि काँग्रेसमध्येच थांबलो. हाच आपल्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरला, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Bhausaheb did not allow me to join NCP with Sharad Pawar, Congress leader Balasaheb Thorat stated the turning point of his politics)
थोरात म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला झाली. पवार साहेबांचे आणि माझे नाते जिव्हाळ्याचे होते. भाऊसाहेबांचे आणि माझे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मी त्यांचा लाडका आमदार होतो. तेव्हा आमदारकीची निवडणूकही आली होती. भाऊसाहेब थोडे तात्विक विचाराचे होते. त्यांनी सांगितले, की तुला काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. तेव्हा मी म्हणालो होतो, की महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचेच वातावरण दिसत आहे. पुढे आमदारकीची निवडणूक आहे. पण ते थोडे कम्यूनिस्ट टाइपचे होते. ते म्हणाले, म्हणजे तू काय आमदारकीसाठी राजकारण करतोय का? तत्वाचा विषय असतो, विचारांचा विषय असतो. तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच थांबलो."
शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...
यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली. आजही जेव्हा मी शरद पवारांना भेटतो तेव्हा अनेक वेळा ते भाऊसाहेबांच्या आठवणी काढतात. आम्ही राजकीय दृष्ट्या जरी वेगळ्या मार्गाने गेलो असलो, तरी एकमेकांबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले.
यावेळी थोरातांनी, चित्रपटांवरही भाष्य केले. कंगना, रनवीर कपूर, ऋतिकचे सिनेमा त्यांना आवडतात, असे त्यांनी सांगितले. तसेच, कलाकृती म्हणून आपण सिनेमा पाहतो, असेही ते म्हणाले.
...म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो -आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."