ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 8 - शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी आठव्या माळेदिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी पहाटे दीड वाजता चरणतीर्थ विधी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोण्यात आले. यानंतर सकाळी सहा वाजता अभिषेक घाट होताच नित्योपचार पंचामृत अभिषेक पुजेस प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजता अभिषेक संपून धुपारती, नैवेद्य, अंगारा हे विधी पार पडले. यावेळी भोपे पुजारी व महंत यांनी श्री तुळजाभवानीची तलवार अलंकार विशेष महापूजा मांडली. या पुजेसाठी शिवकालीन दागिन्यांचा वापर करण्यात आला होता. यात शिवाजी महाराजांची दिलेली १०१ पुतळ्यांची माळ, हिरेजडीत रत्न, माणिक यांच्यापासून बनविलेला सोनेरी टोप, पताका आदी अलंकारांचा समावेश होता. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होवून आपल्या हाताने भवानी तलवार देवून आशीर्वाद दिला होता. त्यामुळे या दिवशी ही अवतार पूजा मांडण्यात येथे. या पुजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील सिंहकक्ष, चांदी दरवाजा, पलंग दरवाजा, विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.