पुणे : नामशेष होत असलेल्या पारशी समाजाची पारंपरिक भाषा ‘अवेस्ता’ हिला पुनर्जीवित करण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुढे सरसावली आहे. ही भाषा शिकवण्यासाठी आणि पारशी धर्मीयांचा प्राचीन धर्मग्रंथ असलेल्या ‘अवेस्ता’ याचे वाचन शिकवण्यासाठी संस्थेच्या वतीने १० दिवसांचा विशेष अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. लंडन विद्यापीठातील ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. अल्मुट हिन्त्से या हा अभ्यासक्रम शिकविणार आहेत.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी ही माहिती दिली. फिरोदिया म्हणाले, भाषा आणि रचना यांच्या बाबतीत वेद आणि अवेस्ता यांच्यामध्ये साम्य आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वेदाचा अभ्यास अथवा त्यात संशोधन करावयाचे असेल तर अवेस्ता ग्रंथाची माहिती असणे आवश्यक मानले जात होते. पण, काळाच्या ओघात अवेस्ताचे अध्ययन कमी होत गेले. त्यामुळे ही भाषा वाचायला शिकवण्यासाठी हा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. ६ ते १७ जुलै या काळामध्ये संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम मोफत शिकविला जाणार आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाचअसा अभ्यासक्रमभांडारकर संस्थेच्या ९८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकारचा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. संस्थेच्या ध्येय-उद्दिष्टांमध्ये इंडो-पार्शियन संबंधांवर अधिक अभ्यास करण्यात यावा, असा उल्लेख केला होता. त्या आधारे आणि प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. अल्मुट हिन्त्से यांनी शिकविण्यास होकार दिल्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती फिरोदिया यांनी दिली.या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ६० लोकांनी नोंदणी केली असून, अजूनही नोंदणी सुरू आहे. या काळात येणाऱ्या नागरिकांना या भाषेतील हस्तलिखितांची माहिती व्हावी, यासाठी अवेस्ता भाषेतील ग्रंथांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर यांनी दिली.
भांडारकर संस्था शिकविणार ‘अवेस्ता’
By admin | Published: July 04, 2015 2:54 AM