ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुणे दौ-यावर असून यावेळी 3600 कोटी खर्च करुन अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवस्मारकावरुन सध्या राज्यात श्रेयवाद सुरु असून भाजपाला मित्रपक्षांच्याही नाराजीला सामोरं जावं लागत आहे. राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावेळी झालेली घोषणाबाजी याचं ताजं उदाहरण आहे. विनायक मेटे यांनीदेखील भाजपावर शोभायात्रेच्या निमित्ताने भाजपा निव्वळ शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरुन शिवसेना नाराज असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यानंतर नरेंद्र मोदी पुण्यातदेखील जाणार असून त्या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातदेखील श्रेयवाद सुरु असून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधीच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते भुमिपूजन करुन घेतलं आहे. त्यानंतर आज शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. काँग्रेसने विरोध केला असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
याशिवाय मुंबईतील बीकेसी विविध प्रकल्पाचं भूमिपूजन तसंच पनवेलमध्ये संस्थेचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर रात्री आठपर्यंत मोदींचे विविध कार्यक्रम आहेत. रात्री आठ वाजता ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा
दुपारी १२ च्या सुमारास पनवेल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्यूरिटीज् मॅनेजमेंटचे उद्घाटन.
दुपारी २.३० च्या सुमारास अरबी समुद्रातील स्मारकाचे जल व भूमिपूजन
दुपारी ३.३० च्या सुमारास बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर मेट्रो, उन्नत रेल्वेमार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्यानंतर जाहीर सभा.
सभेनंतर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्याकडे रवाना.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातील गडकिल्ले आणि शिवचरित्राशी संबंधित जिल्ह्यातून मातीचे कलश आणि सर्व नद्यांचे जलकलश शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. चेंबूर येथील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ढोल-ताशे, शिवकालीन वेशभूषेतील मावळे यांच्यासोबत चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया अशी कलशांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीही काढली.
महाराष्ट्रातील ३६ जिल्हातील नद्यांचे पाणी तसेच गडकिल्ल्यांच्या मातीचे ७२ कलश वाजतगाजत गेट वे ऑफ इंडियाकडे नेण्यात आले. हे कलश ठेवण्यासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी खास रथ तयार केला होता. हे सर्व कलश या रथामध्ये ठेवण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक चेंबूरवरुन गेट ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात सामान्य जनता देखील यात्रेत सहभागी झाली होती. रथाच्या पुढे लेझीम आणि ढोल पथक, रथाच्या मागे बाईक रॅली अशी ही मिरवणुक मोठ्या उत्साहात सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडिया येथे दाखल झाली.
त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर हे कलश नेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन्मानपूर्वक हे सर्व कलश सुपुर्द करण्यात आले. २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधानांकडे सोपविणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल.
या सभारंभासाठी नितीन देसाई यांनी खास शिवकालीन वातावरण दाखविणारा व्यासपीठ उभारला. यावेळीमेघडंबरी आणि किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला होता. या शोभायात्रेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्य मंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
‘शिवस्मारकाच्या जागी नौदल अकादमी उभारा’-
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला नॅशनल फेडरल पार्टीने विरोध केला असून त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज नौदल अकादमी उभारावी, अशी मागणी पार्टीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
नॅशनल फेडलर पार्टीच्या वतीने शुक्रवारी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या परिषदेला पार्टीचे उमेदवार नियुक्ती समितीचे अध्यक्ष जगदीश माणेक यांनी अशी माहिती दिली. पवईच्या डोंगरावर शिवाजी महाराजांचे स्मारक बनविले पाहिज, असे ते म्हणाले.
कडेकोट बंदोबस्त -
शिवस्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याने मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सागरी, यलो गेट पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह भारतीय सागरी तटरक्षक दल आणि नौसेना यांनीही अरबी समुद्रात गस्ती वाढविल्या आहेत. स्थानिक पोलिसांसह शीघ्रकृती दल, एनएसजी कमांडो, फोर्सवन, राज्य राखीव बल, राज्य दहशतवाद विरोधी पथके, नौसेना तैनात ठेवण्यात आली आहे.