कोल्हापूर : आध्यात्मिक कार्याद्वारे स्वत: भोवती भक्तांचे मोठे जाळे निर्माण केलेले आणि अनेक बड्या राजकीय नेत्यांचे गुरु असलेले इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यू महाराज यांनी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या अनपेक्षित निर्णयामुळे त्यांच्या भक्तांना धक्का बसला असून पत्रकार परिषदेतच काही भक्तांनी त्याला जोरदार आक्षेप घेत निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले. आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती स्वीकारणे म्हणजे विरक्ती नव्हे, नैराश्यही नाही. माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी काही करण्याची ताकद आता माझ्यात राहिलेली नाही, त्यांच्यासाठी यापुढे काही करू शकणार नाही म्हणूनच आपण हा निर्णय घेतल्याचे भय्यू महाराज यांनी सांगितले. एकेका महाराजांकडे हजारो कोटींचा निधी आहे, पण दुसरीकडे सामाजिक कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या महाराजाकडे पैसा नाही. स्वत: जवळचे पैसे लावून तरी किती काळ काम करणार, हा प्रश्न आहे. माझ्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे माझ्यासारख्याला कामे थांबवावी लागत आहेत, असेही त्यांनी सांगितले.धर्माच्या नावाने लोकांना गुलाम बनवायला मला आवडत नाही. समाजावर बाजारीकरणाचा प्रभाव असेल तर माझ्यासारख्या नीतीमत्ता असणाऱ्या माणसांनी जायचे कुठे, असा सवाल करत सामाजिक व्यवस्थेत बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.लोकांची दु:खं जवळून पाहतो त्यावेळी मन उद्दिग्न होते. मनात इच्छा असूनही त्यांची दु:खे सोडवू शकलो नाही. कसं जगायचं लोकांनी? असा प्रश्न उपस्थित करत भय्यू महाराज भावनिक झाले. क्षणभर बोलायचे ते थांबले. त्यांना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. त्यांच्या जागी मी असतो आणि त्यांचं दु:ख माझ्या वाटणीला आलं असतं तर काय वाटले असते याचा विचार मी करतो, असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (प्रतिनिधी)नऊ दिवस झोपलो नाहीआध्यात्मिक कार्यातून निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी तब्बल नऊ दिवस मला झोप लागली नाही. सतत नऊ दिवस रात्रभर मी विचार करत होतो. आपली ज्यांना गरज आहे, त्यांना जर मी मदत करू शकणार नसेन, तर मग या क्षेत्रात कशाला काम करायचे, हा प्रश्न मला भेडसावत होता. माझ्यातील काम करण्याची ताकद संपली आहे याची जाणीव झाली, म्हणूनच मी या क्षेत्रातून निवृत्ती घेत आहे, असेही भय्यू महाराज यांनी सांगितले. आता शेती करणार आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतल्यानंतर आता पुढे काय करणार, असे विचारले असता, भय्यू महाराज यांनी यापुढे शेती करणार असल्याचे सांगितले. माझी पत्नी देवा घरी गेली. आई आजारी असते. मुलीकडे लक्ष द्यायचे आहे. घरची शेती करायची आहे. थोडे चिंतन, मनन करणार आहे. पुस्तके सुद्धा लिहायची आहेत.
भय्यू महाराजांनी घेतली ‘निवृत्ती’
By admin | Published: April 14, 2016 1:23 AM