Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 04:52 PM2018-06-12T16:52:11+5:302018-06-12T16:52:11+5:30
आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्याजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेत्यांच्या मानसिक दबावामुळे भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस नेते माणिक अग्रवाल यांनी केला आहे.
'भय्यूजी महाराजांनी भाजपासाठी काम करावं, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता भय्यूजी महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यामुळे सत्य काय ते बाहेर येईल,' असं काँग्रेस नेते माणिक अग्रवाल यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'भय्यूजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून दु:ख झालं. माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानं मला धक्का बसला आहे,' असं केंद्रीय मंत्री नितन गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारनं त्यांना काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्रीचा दर्जा दिला होता. मात्र त्यांनी हा दर्जा नाकारला होता. अनेक दिग्गज राजकीय नेते त्यांचे भक्त होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. अनेक राजकीय समेट घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.