कर्जत : कर्जत स्थानकातील भिसेगाव फाटक या विषयाला मोठा इतिहास आहे. भिसेगाव फाटक असलेल्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी रेल्वे कडून करण्यात आल्याने कर्जतसाठी विशेष असलेल्या या लढ्याचा शेवट झाला आहे. पादचारी पुलाचे काम पूर्ण होत आल्याने आता अर्धवट असलेला फलाटाचे बांधकाम पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, या ठिकाणी पूल झाल्यानंतर फाटक बंद करण्यात यावे यासाठी कर्जतकरांनी केलेले आंदोलन केवळ एक आठवण राहिली आहे.कर्जत यापूर्वीच्या जंक्शन रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडे भिसेगाव फाटक होते, तेथून पूर्वी वाहने देखील जात होती.१९९0 च्या दशकात रेल्वेने ते फाटक बंद करण्याचा घाट घातला, त्याचे कारण म्हणजे मुरबाड रस्त्यावर उड्डाणपूल बांधून पूर्ण झाल्याने स्टेशनला लागून असलेल्या फाटकाची गरज नसल्याचे रेल्वेचे मत होते. पुढे रेल्वेने फलाट एकची लांबी वाढवून भिसेगाव फाटक बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनंत जोशी यांच्या आणि भिसेगाव ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले होते. भिसेगाव ग्रामस्थांनी रेल्वेने भुयारी मार्ग बांधत नाही तोवर फलाट एकची लांबी पूर्ण वाढविली जाणार नाही, असे आश्वासन रेल्वेने दिले होते. त्यासाठी त्यावेळी असलेले खासदार रामशेठ ठाकूर यांनी ५० लाखांचा खासदार निधी देखील देण्याचे कबूल केले होते. या भागातील बाळाजी विचारे आणि पुंडलिक भोईर यांनी ग्रामस्थांसह हा विषय अखंडित सुरु ठेवला होता. भिसेगाव ग्रामस्थ यांचा कागदोपत्री लढा अनेक वर्षे सुरु होता. या लढ्याचे नेतृत्व करणारे अनंत जोशी यांचे निधन झाल्यानंतर पुढे भिसेगाव ग्रामस्थ यांनी स्थानिक खासदार यांच्या माध्यमातून हा लढा सुरूच ठेवला होता. शेवटी मध्य रेल्वेने भिसेगाव फाटक कायम बंद करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या आधी त्या ठिकाणी पादचारी पूल बांधकाम पूर्ण करून वाहतुकीला हा पूल खुला देखील केला आहे. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने भिसेगाव फाटक असलेल्या ठिकाणी जी मोकळी जागा फलाट एक वर ठेवली होती, ती बंद करण्याचे काम तीन दिवसात पूर्ण केले. पूर्वी फलाट एक हा २१ डब्यांच्या मेल एक्स्प्रेस थांब्यासाठी भिसेगाव फाटकापुढे वाढविला होता. मात्र मध्ये जुन्या भिसेगाव फाटक असलेल्या ठिकाणी फलाट हा बांधण्यात आला नव्हता.दरम्यान, फलाटाची अर्धवट असलेली भिंत रेल्वेने तीन दिवसात बांधून पूर्ण केले आहे. त्यामुळे आता काही दिवसात भिसेगाव फाटक येथून रेल्वे मार्ग क्रॉस करून जाणाऱ्या रहिवासी यांना पादचारी पुलावरून जावे लागणार आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून त्यासाठी लढा लढला गेला तो भिसेगाव फाटक हा विषय संपुष्टात आला आहे. (वार्ताहर)
भिसेगाव फाटक बंद होणार!
By admin | Published: August 04, 2016 2:05 AM