मुंबई : रिक्षाचालकाच्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून, दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी अजब शक्कल लढवून मुसक्या आवळल्या. भिकारी आणि फेरीवाले बनून पोलिसांनी तीन तासांच्या आत अपहृत मुलाची सुटका केली. घाटकोपरच्या आझादनगर परिसरात राहणारा आयान शेख, याच परिसरातील लिटल स्टार शाळेत पहिल्या इयत्तेत शिकतो. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर तो त्याच्या मित्रासह मस्ती करत होता. तेव्हा उमेश भागवत (३२) या तरुणाने त्याला खाऊचे आमिष दाखवून जवळ बोलावले. नंतर त्याला विद्याविहार परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. मुलाच्या ओळखपत्रावरील फोननंबर घेऊन त्याच्या वडिलांना फोन केला. मुलगा जिवंत हवा असल्यास दोन लाखांच्या खंडणीची मागणी करत, त्याने फोन ठेवला.मुलाचे वडील रफिक शेख हे रिक्षाचालक आहेत. मुलाचे अपहरण झाल्याने समजताच, रफिक यांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेत, पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. दरम्यान, अपहरणकर्त्याने रफिक यांना पुन्हा फोन केला. खंडणी न मिळाल्यास मुलाला गोळी मारण्याची धमकी त्याने दिली. फोनवरील हे संभाषण घाटकोपर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोरच झाले. तेव्हा या मुलाला वाचवायचेच, असा निर्धार पोलिसांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी तातडीने पाच पथके तयार केली. सर्व पोलीस पथकांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. आरोपीला संशय येऊ नये, म्हणून पोलिसांनी भिकारी, फेरीवाला, सामान्य नागरिक आणि रिक्षाचालक अशा वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये काही पोलीस तर फाटके कपडे घालून या परिसरातील फुटपाथवर झोपले होते, तर काही अधिकारी शेंगा विक्रेते आणि पाणीपुरीवाले बनले होते. या वेळी खंडणी घेण्यासाठी आलेल्या या आरोपीला पोलिसांनी तत्काळ झडप घालून ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा पोलिसांना आढळून आला. गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘भिकारी’ पोलिसांनी साडेचार तासांत केली अपहृत मुलाची सुटका
By admin | Published: January 07, 2016 2:44 AM