नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा - कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद नाशिक शहर तसेच जिल्ह्यातही उमटले़ शहर व जिल्ह्यातील काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांतता असून शहरात सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ दरम्याऩ, नाशिकरोड व जेलरोड परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बस तर सातपूरच्या आयटीआय पुल परिसरात खासगी शाळेची बस, व दोन खासगी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
१ जानेवारीला विरांचे स्मरण म्हणून पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथील विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो नागरीक जातात. सोमवारी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सुरळीत कार्यक्रम सुरू असताना दोन गटात वाद होऊन दगडफेक झाली़ यामध्ये महिला, पुरूष व लहान मुले जखमी झाले असून समाजकंटकांनी काही वाहनांची तोडफोड व जाळपोळही केली़ या घटनेचे पडसाद नाशिक शहरात उमटले असून नाशिकरोडला दोन, जेलरोडला एक, सारडा सर्कल परिसरात एक अशा महामंडळाच्या चार बस, सातपूर आयटीआय पुलाजवळ खासगी शाळेची एक बस व दोन खासगी वाहने अशा सात वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्या आहेत़
भीमा - कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मनमाड, मालेगाव येथे बंद पाळण्यात आला असून येवला तालुक्यातील सायगाव येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ शहरात देवळाली कॅम्प परिसर बंद करण्यात आला आहे़ तर नाशिकरोड परिसरातील रिपाई, आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी घटनेच्या निषेध करून दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना निवेदन दिले़ तर गरवारे पॉर्इंट येथे रास्ता रोको करण्याचा तयारीत असलेल्या काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीणमध्ये तर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शहरात शांतता आहे़
सोशल मिडियावरून पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झाले असून शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ दरम्यान, सोशल मिडियावरून कोणी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे़