दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. नदीला पाणीच नसल्यामुळे कांदा लागवड बंद आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भीमा नदीला चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. तसेच पाण्याअभावी कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. दोन दिवसांपूर्वी या बंधाऱ्याला ढापे लावले आहेत. मात्र नदीला वाहते पाणीच नसल्यामुळे बंधाऱ्यात यंदा अजून पाणी साठले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तातडीने भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, मनोहर मांजरे, यांच्यासह खरपुडी, मलघेवाडी, शिरोली, मांजरेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)>वीजपंप पडले मोकळेमांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी या परिसरातून भीमा नदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच आॅक्टोबर महिन्यात कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी ही पिके घेतली आहेत.
भीमा नदी कोरडी
By admin | Published: October 31, 2016 1:23 AM