लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : शहरांमधील लाईटचा कृत्रिम झगमगाट हा निसर्गातील पाणी, कोळसा, सूर्यप्रकाशामुळे तयार झालेला असतो. हा झगमगाट चांगला जरी दिसत असला तरी त्यामागे प्रदूषण, प्रचंड धावपळ, निसर्गाची हानी आहे. पण सध्या निसर्गात नैसर्गिक लखलखाट सुरू झाला आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात ‘काजव्यांच्या’ प्रकाशाने झाडे व सर्व परिसर झगमगून गेला आहेत. आकाशातील तारांगण जणू जमिनीवर भेटायला आल्यासारखे हे काजवे चमकताना पाहून वाटते.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नर काजवे मादीला आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे चमकत असतात. हे अतिशय अविस्मरणीय आणि अतिशय सुंदर दृश्य असते. इमारतींवर सोडलेल्या लाईटच्या माळा जशा चमकतात तसे हे हजारो काजवे लुकलुक करत असतात. आकाशातील ‘तारांगण’ जसे दिसते तसे हुबेहूब दृश्य दिसते. जणू तारांगणच जमिनीवर भेटायला आल्यासारखे वाटते. काही पूर्ण झाडांवर काजवे चमकत असतात. हे पाहून नाताळमधील ‘ख्रिसमस ट्र्री’ असल्यासारखा वाटतो. चित्रपट निर्मात्यांनाही या काजव्यांनी भुरळ घातली आहे.काजव्याच्या नावाने जुगनू चित्रपट निघाला, तसेच अनेक गाणी या काजव्यांवर तयार झाली आहेत. अशा प्रकारे काजवे चमकणे म्हणजे चांगल्या निसर्गाचे निदर्शक आहेत. जर झाडे तुटली, जंगलांमध्ये माणसांचा वावर वाढला, वाहतूक वाढली, नागरीकरण वाढले तर हे दृष्य दिसणार नाही. ज्या ठिकाणी माणसाचे आक्रमण कमी आहे, अशाच ठिकाणी लक्षावधींच्या संख्येने हे काजवे दिसतात. हिरे-माणके आणि सोने चांदीपेक्षाही यांचा प्रकाश अतिशय लख्ख आणि डोळे दीपवून टाकणारा असतो.इंग्रजीमध्ये या क्रियेला ‘ग्रोवार्न’ म्हणजेच प्रकाशमयआयू असे म्हणतात. हे दृष्य म्हणजे न बोलता प्रकाशाची भाषा आहे. सकाळच्या वेळी सूर्य जसा आपल्याला पूर्ण ऊर्जा देतो तसा रात्रीच्या वेळी हे काजवे चमकून आपल्या इच्छाशक्तीला ऊर्जा देतात.काजव्यांचे हे सुंदर दृष्य सध्या पश्चिम घाटात पाहावयास मिळत आहे. भंडारदऱ्यापासून तर कळसूबाई, हरिश्चंद्रगड, माळशेज, नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर, लोणावळा, ताम्हिणी या परिसरात मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी हे काजवे चमकताना दिसत आहेत. अनेक हौशी पर्यटक, फोटोग्राफर, अभ्यासक हे चमचमणारे काजवे पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. १५ ते २० दिवस चालणारा हा हा महोत्सव पाहण्यासाठी डोंगरात तंबू टाकून राहावे लागते. आकाशातील तारांगण जणू जमिनीवर आल्यासारखा भास रात्रीच्या वेळी चमकणारे काजवे पाहून वाटत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिलनासाठी अशा प्रकारे काजवे चमकतात. हे दृष्य आंबेगाव तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये सध्या दिसत आहे.
भीमाशंकर अभयारण्य उजळले काजव्यांनी...!
By admin | Published: June 06, 2017 1:37 AM