लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : ‘काय झाडी, काय डोंगर, काय प्राणी.. सर्व मस्तच!’ असं म्हणत आणि श्रावणातल्या निसर्गाच्या प्रेमात पडून भीमाशंकरवरची यशस्वी चढाई डहाणूतील केशवी माच्छी या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीने ३१ जुलै रोजी केली. मागच्या वेळी काका ट्रेकिंगला घेऊन न गेल्याने तिने भीमाशंकरवर जाण्याचा हट्ट धरला. अखेर त्या जिद्दीच्या जोरावर साडेअकरा तासांच्या प्रदीर्घ कालावधीत १७ किमीचे ट्रेकिंग तिने गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपसोबत पूर्ण केले. तिच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स या ग्रुपने ३१ जुलै रोजी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या गडावर ट्रेकिंगचे नियोजन केले होते. याकरिता ३० जुलैच्या रात्री १० च्या सुमारास डहाणूहून खाजगी वाहनाने प्रवासाला सुरुवात केली. या ग्रुपसोबत वडकून खेतीपाडा येथील आनंद माच्छी पत्नी, बहीण व पुतणी यांसह निघाले. मात्र आपणही सोबत येणार, मागच्या ट्रेकिंगला घेऊन न गेल्याने २ वर्षे १० महिन्यांची केशवी काही केल्या ऐकेना म्हणून तिलाही सोबत घेतले. या ग्रुपने ३१ जुलैच्या सकाळी साडेसहा वाजता खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईसाठी सुरुवात केली. त्यासोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पायऱ्या नसल्याने काका-काकूंचा तर कधी आत्या व बहिणीचा हात धरून ती चालू लागली.
या प्रवासात कुटुंबीयांनी तिला उचलून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र नुकताच श्रावण सुरू झाल्याने भीमाशंकर गडावरील हिरवा डोंगर, झाडे-झुडपे, छोटे धबधबे, पक्षी तसेच माकड, शेकरू, गाई-ढोरे यांना पाहून तिला जणू भुरळच पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमण करीत होती. श्रावणमास असल्याने भक्तांची खूपच गर्दी होती. छोट्या केशवीला पाहून त्यांच्याकडून कौतुक सुरू होते. त्यामुळे तिचाही उत्साह वाढल्याने कोणतीही कुरबुर न करता अथवा मदत न घेता गणेश घाटाच्या मार्गाने १२ वाजताच्या सुमारास ८.७० किमीची चढाई तिने पूर्ण केली. त्यानंतर दीड वाजता परतीचा प्रवास सुरू झाल्यावरही ती स्वतःहून पुढे झाली. तिचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.
तिच्या जिद्दीला सलाम पायथा गाठताना ती थकली. मात्र या ग्रुपने तिला प्रोत्साहित केल्याने साडेसहाच्या सुमारास तिने एकटीने यशस्वीरीत्या ट्रेकिंग पूर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, सराव नसताना केवळ काकांसोबत ट्रेकिंगला जाण्याच्या जिद्दीपोटी तिने ही कामगिरी केली आहे.