मुंबई- 2019 च्या निवडणुकीआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असंही भाजपा जाहीर करू शकतं, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' असं पूर्ण नाव वापरलं पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावरून प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपाला 2019 च्या आधी त्यांचा अजेंडा निश्चित करायचा आहे. त्यामुळे हे सगळं फक्त मतांसाठी चाललं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल करण्यापूर्वी कुणीही त्यांच्या परिवाराशी संपर्क केला नसल्याचं आनंद आंबेडकर यांनी म्हंटलं. बाबासाहेब आंबेडकर हे मराठीत सही करतानाच भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत एरवी ते बी आर आंबेडकर अशीच सही करत असं आनंद आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात आताच रामजी का आणलं जातं आहे? यामागील राजकीय हेतू नेमका काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बसपानेही उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दाखविण्यासाठी व स्वस्तातील लोकप्रियता मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचं मायावती यांनी म्हटलं. भाजपाचे लोक दलित मतांसाठी ह्रदयावर दगड ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि त्यांच्यावरून विविध नाटकं करतात, अशी टीका त्यांनी केली. महात्मा गांधींचं पूर्ण नाव कधीच कुणी घेत नाही. भाजपा सरकार जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पूर्ण नाव लिहिते का? त्यामुळे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून स्वार्थी राजकारण का केलं जातंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.