भिवंडी : येथील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (आरएसएस) अनुद्गार काढल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावे समन्स जारी केले. 7 ऑक्टोबरला भिवंडी कोर्टात हजर होऊन आपले म्हणणो मांडण्याचे आदेश राहुल गांधी यांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीनिमित्त भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावी 6 मार्चला राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली होती. त्या सभेत ‘महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केली’, असा उल्लेख त्यांनी भाषणात केला. या वक्तव्याने आरएसएसची बदनामी झाल्याचा आरोप करून संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात राहुल गांधींविरोधात खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने निजामपूर पोलिसांना अहवाल देण्यास सांगितले होते. अहवाल आल्यावर तक्रारीसोबत जोडलेले पुरावे पाहून आणि फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणो ऐकून कोर्टाने राहुल यांना समन्स काढले.