मिलिंद बेल्हे । लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : एकीकडे देशात काँग्रेसमुक्त भारताचा नारा भाजपाकडून दिला जात असतानाच भिवंडीत बहुमत मिळाल्याने त्या पक्षाच्या अस्मितेला नवे धुमारे फुटण्याची शक्यता आहे. खासकरून अल्पसंख्य समाज अजूनही काँग्रेसच्या पाठीशी आहे, हा समज बळकट करण्यास या निकालाचा आधार मिळेल. भाजपाने गेल्या वेळेपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवल्या असल्या, तरी प्रत्येक वेळी इतर पक्ष फोडून त्या आधारे निवडणूक जिंकता येत नाहीत, याचा धडा त्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीने दिला. काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर त्या पक्षाचा मोठा गट फुटेल आणि भाजपाप्रणीत आघाडीत सहभागी होईल, या आशेवर भाजपाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना काँग्रेसच्या नेत्यांनीच सुरुंग लावला. असंतुष्टांना तिकीट वाटपात पुरेसे स्थान दिल्याने भिवंडीत आधीपासून सर्वात मोठा असलेला काँग्रेस पक्ष एकसंध राहिला आणि ९० पैकी ४७ जागा जिंकत बलाढ्य ठरला. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेससोबत आघाडी हवी होती. पण, जागावाटपात काँग्रेसने मोठा वाटा स्वत:साठी राखून ठेवल्याने काँग्रेसला ताकदीचा भ्रम असल्याची टीका करत त्या पक्षांनी वेगळी आघाडी केली, पण ती आघाडी आणि तिची ताकद किती मर्यादित होती, हे समाजवादी पक्षाच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या शून्य जागांनी दाखवून दिले. मनसे, एमआयएम यांच्या क्षीण ताकदीला त्यांच्या नेत्यांची धरसोड वृत्ती कारणीभूत असल्याचेही निकालात दिसले. एमआयएमच्या पहिल्या सभेकडे मतदारांनी पाठ फिरवल्याने त्या पक्षाला अपेक्षित ध्रुवीकरण घडवता येणार नाही, याची कल्पना त्यांना आणि त्याविरोधात वातावरण तापवणाऱ्या भाजपालाही आली.भाजपाला संघर्ष भोवलाराष्ट्रवादीमधून भाजपात येऊन खासदार झालेल्या कपिल पाटील यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली. त्यातून पक्षात भाजपावादी आणि नवभाजपावादी असा संघर्ष उभा राहिला. त्याला संघ परिवाराची साथ मिळाली. पक्षानेच त्यांना मुक्तहस्त दिल्याने विरोधकांची डाळ शिजली नाही, पण ही नाराजी भाजपाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग करण्यास कारणीभूत ठरली. मागील वेळेच्या आठ जागांवरून पक्षाने १९ पर्यंत मजल मारली असली, तरी वेगवेगळे पक्ष सोबत घेत सत्तेचा सोपान चढण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला. शिवसेनेलाही धक्का : काँग्रेसची मुसंडी आणि भाजपाच्या वाढलेल्या ताकदीच्या परिणामी मागील निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागांची संख्या चारने घटली. संघटनात्मक ताकद, एक आमदार सोबत असूनही शिवसेनेला हा फटका सहन करावा लागल्याने जिल्ह्यावर एकहाती अंमल चालवणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रामीण भागातील शिवसेनेच्या ताकदीला धक्का पोहोचल्याचा विचार नक्की करावा लागेल.
भिवंडीचा कौल काँग्रेसला उभारी देणारा
By admin | Published: May 27, 2017 2:55 AM