कोपरी : ठाण्यातील साकेत मैदानासमोरील एका निर्जनस्थळी ३ जून रोजी पहाटे आढळून आलेल्या दोघा अनोळखींपैकी सतेंद्र राजेश्वर पांडे याचा खून झाल्याचे आढळून आले होते. या खुनाचा छडा राबोडी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला.याप्रकरणी अश्पाक शेख रुग्णवाहिका चालक (रा. कल्याण), महेश शिर्के कंत्राटदार, मंजूर अन्सारी सफाई कामगार आणि जय सुखदेव धरीनया सफाई कामगार या भिवंडीतील अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ११ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. दारूच्या नशेत इतर रु ग्णांना त्रास दिल्याने चौकडीने सतेंद्र आणि बिरेन वर्मा दोघांना बेदम मारहाण केली होती. त्यातच सतेंद्रचा मृत्यू झाला, तर बिरेन गंभीर जखमी झाला होता. हे दोघे भिवंडीतील रहिवासी असून याप्रकरणी राबोडी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी चौकडीला अटक केली.राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिल्लकार्जुन सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी पहाटे ४च्या सुमारास उपनिरीक्षक मोघले पथकासह रात्री साकेत रोडवर पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळेस त्यांना साकेत मैदानासमोर हे दोघे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित त्यांना कळव्याच्या छत्रपती रु ग्णालयात दाखल केले. मात्र त्या दोघांपैकी सतेंद्रचा मृत्यू झाला. तर बिरेन गंभीर अवस्थेत होता. शुक्र वारी सायंकाळी जखमी बिरेन हा शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे हा प्रकार उघड झाला. ३ जून रोजी सकाळी सतेंद्र आणि बिरेन हे दोघे दारूच्या नशेत होते. तशाच अवस्थेत या दोघांना एकाने बेवारस म्हणून भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. दरम्यान, मृत सतेंद्र आणि जखमी बिरेन या दोघांच्या आजाराचा त्रास इतर रुग्णांना होत होता. त्यामुळे रुग्णालयातील काही लोकांनी रुग्णालयाचा कंत्राटदार शिर्केकडे याबाबत तक्रार केली. (वार्ताहर)
भिवंडी खुनातील चौकडी जेरबंद
By admin | Published: June 09, 2014 3:00 AM